मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांसह ठाणे जिल्हयातील नेतेही यात्रेत सहभागी झाले आहेत. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि ठाणे जिल्हयाचे सहप्रभारी संतोष केणे यांनीही ठाणे, पालघर जिल्हयातील विविध प्रश्नावर राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. राहुल गांधी यांनी ठाणे पालघर जिल्हयातील प्रश्न समजून घेत, त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे केणे यांनी सांगितले.
भारत जोडो यात्रा कन्याकुमारी येथून सुरू झाली आहे. हजारो मशाली हाती घेऊन राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली ही यात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात पोहचली. त्या दिवसापासून संतोष केणे हे भारत जोडो यात्रेत चालत आहेत. ठाणे आणि पालघर जिल्हयात काँग्रेस पक्ष कसा बळकट करता येईल या विषयावर त्यांनी राहुल गांधीशी चर्चा केली. एकेकाळी ठाणे, पालघर परिसर हा काँग्रेसमय होता. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जायचा, मात्र गेल्या काही वर्षापासून या परिसरात काँग्रेस मागे पडली. त्यामुळे काँग्रेसच्या मजबुती करण्यासाठी काय उपाययोजना कार्यक्रम आखता येऊ शकतील याविषयी त्यांनी चर्चा केली. तसेच स्थानिक भूमिपुत्रांच्या समस्या, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेसने केलेली आंदोलन लढा विषयी त्यांनी राहुल गांधींना माहिती दिली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित होते.
कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतच्या भारत जोडो पदयात्रेला ठिकठिकाणी अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. विविध घटकातील नागरिक पदयात्रेत सहभागी होत आहेत. राहूल गांधी हे वंचित, पीडित, कष्टकरी शेतकरी विद्यार्थी, सामान्य जनतेला भेटत असून त्यांच्या समस्या ऐकून घेत त्यांना आधार देत आहेत असेही केणे यांनी सांगितले.