मुंबई : आम्ही एका व्यक्तीच्या विरोधात लढत नाही. एका व्यक्तीचा चेहरा समोर करण्यात आला आहे. आम्ही एका शक्तीच्या विरोधात लढत आहोत. राजाचा जीव ईव्हीएम मशीनमध्ये आहे. देशातील प्रत्येक संस्थेत आहे, ईडीमध्ये आहे, सीबीआय मध्ये आहे, आयकर विभागात आहे, अशी जहरी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मुंबईतील सभेत केली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची आज मुंबईत सांगता करण्यात आली. यावेळी त्यांनी मुंबईत भव्य जाहीर सभाही घेतली. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कातून त्यांनी मुंबईतील जनतेशी संवाद साधला. यावेळी या सभेसाठी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि भारत आघाडीचे इतर नेते आले आहेत.इंडिया आघाडीचेही काही नेते उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी भाजप आणि मोदींवर जोरदार हल्लाबोल केला.
ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी, भाई और बहनों हा फक्त एक चेहरा आहे. चित्रपटातील नायकाप्रमाणे त्यांना एक रोल दिला गेला आहे. 56 इंचची छाती नसून खोकला आहे. मला विचारण्यात आलं तुमची यात्रा कुठून कुठपर्यंत होईल. मी विचार केला, मात्र एक ठरलं होतं यात्रा मणिपूरमधून सुरुवात होईल. तिथे भाऊ भावाला गोळी मारत आहे. तिथूनच यात्रेची सुरुवात करण्याचा ठरवलं. तसेच, यावेळी मी विचार केला भारताला नवीन व्हिजन द्यायचा असेल, यात्रेचे समारोप धारावीत झालं पाहिजे. धारावीत टॉयलेट आहे, आज या धारावीमधील लोकांना ती शक्ती त्यांच्या घरातून बाहेर काढून फेकत आहे.
मोदींकडे भ्रष्टाचार नावाची मोनोपॉली
नरेंद्र मोदी ईव्हीएमशिवाय जिंकू शकत नाहीत. निवडणूक आयोग मशिन का दाखवत नाही? ईव्हीएमच्या कागदाची मोजणी करण्यास सरकार तयार नाही, असं म्हणत राहुल गांधी यांनी टीका केली. जेव्हा चीनला फायदा होतो, तेव्हा इथल्या करोडपतींना लाभ होतो. मोदींकडे भ्रष्टाचार नावाची मोनोपॉली आहे. पण मला विश्वास आहे, तुम्ही देशात प्रेमातं दुकान उघडाल. मला विश्वास आहे, ‘आप नफरत के बाजार मैं मोहोब्बत की दुकान खोलेंगे’, असं म्हणत राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीचा नारळ फोडला आहे.
अशोक चव्हाण फोन करून रडले …
काँग्रेस पक्षाचे एक वरिष्ठ नेते आहेत, मी त्यांचं नाव घेणार नाही. ते याच राज्यातील आहेत. त्यांनी माझ्या आईला (सोनिया गांधी) फोन करून रडत सांगत होते, सोनियाजी मला लाज वाटते, माझ्यात यांच्याशी लढण्याची ताकद नाही, मला जेलमध्ये जायचं नाही अशा शब्दात राहुल गांधी यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला. अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राहुल यांनी हाच धागा पकडत मुंबईमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या रॅलीत अशोक चव्हाण यांचे नाव न घेता हल्लाबोल केला.
मोदींची गॅरंटी खोटी आहे, ती चालणार नाही : शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, आज ज्यांच्या लोकांच्या हातात सत्ता आहे त्यांनी महिला, शेतकरी, कामगार, आदिवासी, दलितांनी जे आश्वासन दिली होती ती पूर्ण केली नाहीत. आश्वासन देऊन जनतेला फसवले त्यांना हटवण्याची गरज आहे. मोदींची गॅरंटी खोटी आहे, ती चालणार नाही. मुंबईतूनच महात्मा गांधी यांनी छोडो भारतचा नारा दिला होता आज छोडो भाजपा हा नारा दिला पाहिजे.
अब कि बार भाजप तडीपार : उध्दव ठाकरे
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपा हा एक फुगा आहे आणि त्या फुग्यात हवा भरण्याचे काम शिवसेने केले आहे. आता भाजपच्या डोक्यात हवा गेली आहे. आता लढाई आहे ती लोकशाही व संविधान वाचवण्याची. घटना बदलण्यासाठी भाजपाला ४०० पार जागा आहेत. देश हाच माझा धर्म आणि देश वाचला तरच आपण वाचू. कोणी कितीही मोठा असू त्याच्यापेक्षा देश मोठा असतो. २०१४ पासून एकाच पक्षाचे सरकार आहे, कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आला नाही. जनता एकवटली तर हुकूमशाहीचा अंत होतो. अब की बार भाजपा तडीपार अशी घोषणा घेऊन गावागावात जा, असे ठाकरे म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, इलोक्टोरल बाँडबदद्ल अमित शाह स्पष्टीकरण देत आहेत पण फ्युचर गेमिंग सारख्या अनेक कंपन्या आहेत ज्यांनी नफ्यापेक्षा जास्त किमतीचे बाँड खरेदी केली, त्यांच्याकडे हा पैसा कुठुन आला, याची चौकशी केली पाहिजे. ईव्हीएमच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी आवाज उठवावा असे आवाहनही त्यांनी केले.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलीन यांनी भाजपावर टीका करत सेव्ह इंडियाचा नारा दिला व भारत जोडो न्याय यात्रेने देश जोडण्याचे काम केल्याचे म्हणाले.
बिहारचे विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव म्हणाले की, कितीही दबाव टाकला तरी आम्ही कोणीही झुकणारे नाहीत, सर्वजण लढणारे आहेत. लालू प्रसाद यांच्यावर दबाव आणला पण ते झुकले नाहीत. भारताच्या स्वातंत्र्यात भाजपाचे योगदान काय असा सवाल त्यांनी विचारला.
झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन म्हणाले की, देशातील हुकुमशाहीविरोधात सर्वजण एकत्र आलो आहेत, ही एकजूट कायम ठेवू व हुकूशाही वृत्तीच्या भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचू.
झारखंड मुक्ती मार्चाच्या नेत्या कल्पना हेमंत सोरेन म्हणाल्या की, आमदारांना खरेदी करुन महाराष्ट्रातील सरकार पाडले. विरोधकांवार दबाव टाकला जातो. भाजपा सरकारने हेमंत सोरेन यांनाही जेलमध्ये टाकले पण झारखंड झुकला नाही व इंडियाही झुकणार नही असा निर्धार केला.