भांडूपच्या मॉलमधील व्यावसायिक गाळयांमध्ये स्थानिक गुंडाची घुसखोरी
एमएमआरडीए अधिकारी आणि पोलिसांच्या डोळयावर पट्टी
गाळेधारक व महिला कर्मचारी दहशतीखाली
मुंबई : भांडूप पूर्वेतील रेल्वे स्थानकाशेजारी एमएमआरडीएने बांधलेल्या मॉलमधील व्यावसायिक गाळयांमध्ये स्थानिक गुंडांनी घुसखोरी करून तेथील गाळे भाडयाने दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. तसेच मॉलमध्ये अनैतिक प्रकारही सुरू आहेत. या प्रकरणी इतर गाळेधारकांनी एमएमआरडीए व भांडूप पोलिसांकडे तक्रारही केलीय. मात्र स्थानिक गुंडांकडूनच त्यांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. तरी सुध्दा याकडे दुर्लक्ष करीत एमएमआरडीए अधिका-यांनी आणि पोलिसांनी डोळयावर पट्टी बांधल्याने गाळेमालकांमध्ये भितीचे वातावरण पसलय. त्यामुळे आता गाळेधारक लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
मॉलमध्ये एकूण ३५६ व्यावसायिक गाळे आहेत. स्थानिक गुंडांनी १५० गाळयांचे कुलूप तोडून, खोटी कागदपत्रांच्या आधारे ती भाडेतत्वावर दिली असून, त्यातून दरमहिना लाखो रूपये भाडे वसुली केली जात असल्याची माहिती गाळेधारक रेवनाथ गायकवाड यांनी दिली. व्यावसायिक गाळे बळकावल्याबाबत तसेच स्थानिक गुंडांच्या दादागिरीला गाळेधारकांना रोजच त्रास सहन करावा लागत असल्याने इतर गाळेधारकांनी एमएमआरडीए अधिकारी व भांडूप पोलिसांकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यांनीही याकडं कानाडोळा केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातय. गाळेधारक रेवनाथ गायकवाड यांनी तक्रारी केल्याने त्यांना स्थानिक गुंडांकडून जीवे ठार मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्यात, मात्र त्याचीही पोलिसांकडून दखल घेण्यात आलेली नाही. स्थानिक गुंडांना मिळत असलेल्या लाखेा रूपयांच्या भाडेवसुलीत एमएमआरडीए अधिकारी आणि पोलिसांचे आर्थिक हितसंबध गुंतले असल्यानेच त्या गुंडांवर कोणतीच कारवाई होत नसल्याचा आरोपही गाळेधारकांकडून केला जातोय. तसेच हा मॉल पाच मजली असून याठिकाणी लिफ्ट, पाणी आणि फायर फाईटींग अशा कोणत्याच सोयी सुविधा केलेल्या नाहीत. मात्र त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे हॉटेल सुरू करण्यात आले आहे तसेच या मॉलमध्ये वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती स्थानिकांकडून सांगण्यात आली.
महिलांची सुरक्षितता धोक्यात
मॉलमध्ये दारूडे, गद्दुले यांचाही वावर असतो त्यामुळे या ठिकाणी काम करणा-या महिला कर्मचा- यांमध्ये भितीचे वातावरण आहे. महीलांसाठी असलेले शौचालयही तोडून टाकण्यात आले असून, त्याचा वापर पुरूष मंडळी करीत आहेत. त्यामुळे महिला कर्मचा- यांना रेल्वे स्थानकातील शौचालयाचा वापर करावा लागतो. रात्रीच्यावेळेस या ठिकाणी दारूच्या पाटर्या केल्या जातात. त्या दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि इतर पदार्थही इतर गाळेधारकांच्या दुकानासमोरच टाकला जातो. त्यामुळे स्थानिक गुंडांच्या दादागिरीला गाळेधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत अशी माहिती किर्ती मिश्रा या महिलेने दिली.
————
काय म्हणतात अधिकारी
यासंदर्भात प्राधिकरणाचे उपायुक्त दिलीप कवठकर यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी मी मिटीग असून या संदर्भात मला काहीच माहिती नाही असे सांगितले. त्यानंतर प्राधिकरणाचे सामाजिक विकास अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्यानंतर त्यांनी मी पत्रकारांशी बोलत नाही आणि भेटतही नाही असे उत्तर देऊन जबाबदारी झटकली.