बाळकडू शिवसेनेचे, नगरसेविका बनली भाजपची !

भांडूपच्या प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत जागृती पाटील विजयी

( संतेाष गायकवाड )
मुंबई   : मुंबई महानगरपालिकेतील सत्तेतील गणित जुळवण्यासाठी भांडूपमधील प्रतिष्ठेच्या ठरलेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा दारूण पराभव करून विजय मिळविला. नवनिर्वाचित नगरसेविका जागृती पाटील या कल्याण डोंबिवली महापालिकेतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांच्या कन्या आहेत. त्यांना माहेरी शिवसेनेचे बाळकडू मिळाले असले तरी सासरी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून त्या भाजपच्या नगरसेविका बनल्या आहेत.

भांडुप पश्चिमेतील प्रभाग क्र. ११६ कॉंग्रेस पक्षाच्‍या तत्‍कालीन नगरसेविका प्रमिला पाटील यांच्‍या निधनामुळे रिक्‍त झालेल्‍या जागेवर पोटनिवडणुक पार पडली. प्रमिला पाटील यांच्या सून जागृती पाटील यांनी भाजपमधून तर शिवसेनेचे मिनाश्री पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली. जागृती पाटील यांनी ४ हजार ७९२ मतांनी विजय मिळवला. यात जागृती पाटील यांना ११ हजार १२९ मते मिळाली तर शिवसेनेच्या मिनाश्री पाटील यांना ६ हजार ३३७ मते मिळाली. मिनाश्री पाटील या सेनेचे आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी आहेत. जागृती पाटील यांचे माहेर हे डोंबिवलीचे आहे. त्यांचे वडील वामन म्हात्रे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. तर त्यांच्या काकी कविता बाळा म्हात्रे या ही शिवसेनेच्या नगरसेविका होत्या. तसेच त्यांचे मेाठे बंधू अनमोल म्हात्रे हे सुध्दा शिवसेनेच्या युवा सेनेचे पदाधिकारी आहेत. म्हात्रे कुटूंबिय हे कल्याण डोंबिवलीत कट्टर शिवसैनिक म्हणूनच ओळखले जातात. त्यामुळे जागृती यांना लहानपणापासूनच सेनेचे बाळकडू मिळाले आहे. मात्र पेाटनिवडणुकीत जागृती यांनी शिवसेनेच्याच उमेदवाराचा सामना करीत विजय मिळवला आहे.त्यामुळे भांडूपमध्ये पून्हा एकदा पाटील कुटूंबियांचे वर्चस्व प्रस्थापित असल्याचे शिक्कामोर्तब झालय.

माझा विजय हा मम्मींना खरी आदरांजली
आजचा विजय हा सासू प्रमिला पाटील यांनाच खरी आदरांजली आहे. मम्मींचा आशिर्वाद आणि त्यांनी केलेल्या कामाचे फळ मिळाले आहे. वडील २५ वर्षे शिवसेनेचे नगरसेवक आहेत. तसेच स्थायी समितीचे सभापती होते. राजकारणाचे बाळकडू घरातून मिळालेले असले तरी सासर ही राजकीय कुटूंब असणारे मिळाले. माझे सासरे अप्पा हे आमदार हेाते. तर सासू प्रमिला पाटील या नगरसेविका होत्या. भांडूपच्या जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून निवडून दिले. त्यांचे आभारी असून प्रभागाचा कायापालट करणार असे भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका जागृती पाटील यांनी सिटीझन जर्नलिस्टशी बोलताना सांगितले.

भाजपा सत्तेच्या जवळ पोहचतेय..
मुंबई महापालिकेत शिवसेनेचे ८४ तर भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपच्या नगरसेविका शैलजा गिरकर यांचे निधन झाल्याने भाजपचे नगरसेवक ८१ झाले होते. मात्र भांडूपच्या पेाटनिवडणुकीत भाजपने विजय मिळविल्याने त्यांचे पून्हा ८२ नगरसेवक झाले आहेत. गिरकर यांच्या जागेवर पेाटनिवडणूक झाल्यानंतर भाजपने कमळ फुलवले तर त्यांची संख्या ८३ होऊ शकते. त्यावेळी भाजप सेनेच्या बरोबरीला जाऊन सत्तेच्या जवळ पोहचू शकते. सध्या सेनेकडे ४ अपक्ष तर भाजपकडे २ अपक्ष आहेत. त्यामुळे घोडेबाजार होऊन सत्तेची उलापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हक्काची जागा काँग्रेसने गमावली
नांदेडमध्ये काँग्रेसने बाजी मारली असतानाच, भांडूपच्या हक्काच्या जागेवर काँग्रेसच्या उमेदवार प्रमिला सिंग यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ ३० झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!