नाशिक (प्रतिनिधी) : राग, द्वेष, मत्सर, निंदा या दुर्गुणांपासून नेहमी लांब राहून कोणाबद्दलही वाईट विचार मनात आणू नका. कोणाचे चांगले करता आले नाही तरी चालेल मात्र कोणाचे वाईट करु नका. नेहमी निर्मळ अन् शुद्ध अंत: करण ठेवा. चांगले करा म्हणजे चांगलेच होईल. ‘भला करो – भला होगा’ असे विचार अखिल भारतीय श्री स्वामी स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांनी मांडले. दिंडोरी प्रधान केंद्रात रविवारी (30 जुलै) प्रदोष पर्वावर साप्ताहिक प्रश्नोत्तरे-मार्गदर्शन आणि सत्संग समारोह सेवेकर्यांच्या अभूतपूर्व प्रतिसादात पार पडला. यावेळी गुरुमाऊलींनी सेवेकर्यांना संबोधित केले.
गुरुमाऊली म्हणाले की, संत मालिकेने समाजा-समाजातील अंधश्रद्धा कुप्रथा दूर करुन समाजाला जागे केले. समाज संघटित केला आणि अज्ञानी जनाला ज्ञानी केले. आज हेच सेवाकार्य ग्राम व नागरी विकास अभियानाच्या माध्यमातून सेवेकर्यांना करावयाचे आहे. त्याकरिता स्वामीकार्य घराघरात पोहोचविणे गरजेचे आहे. सेवामार्गाचे सर्व अठरा विभाग वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्राच्या हितासाठीच आहेत. हे कार्य प्रत्येक घराघरात आणि मनामनात पोचले तर आध्यात्मिक क्रांती घडेल असे त्यांनी नमूद केले.
सध्या पुरुषोत्तम मास सुरु आहे. अधिक मासात भगवान विष्णुंची सेवा अधिक फलप्रद होते.रोज सायंकाळी 7 वाजता दिंडोरी प्रणीत सेवामार्ग या यु ट्यूब चॅनेलवरुन प्रसारित होणार्या संक्षिप्त भागवत पारायणात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. प्रति गुरुवारी आणि रविवारी दिंडोरी दरबारी वैयक्तिक- कौटुंबिक समुपदेशन तसेच विवाह नोंदणी आणि असाध्य आजारांवर मार्गदर्शन केले जाते. या सर्व विनामूूल्य सेवा दिल्या जातात अशी माहिती त्यांनी दिली.
गुरुपीठात भागवत सप्ताहाला प्रारंभ
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठामध्ये सुलभ भागवत सप्ताहाला 30 जुलैपासून प्रारंभ झाला. परमपूज्य गुुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने अधिक मासानिमित्त ही सेवा होत आहे. गुरुपुत्र चंद्रकांतदादा मोरे, गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे, गुरुपुत्र आबासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत भागवत सप्ताह सुरु झाला. या सेवेला संपूर्ण राज्यभरातून सेवेकरी आले आहेत. या सप्ताह काळात श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाह, गोवर्धन पूजा, समाराधना, सत्यनारायण पूजा आदी विशेष सेवा होणार आहेत.