मुंबईकरांचा बेस्ट प्रवास महागणार ?
मुंबई : आर्थिक डबघाईत सापडलेल्या बेस्टने ८८० कोटी तुटीचा अर्थसंकल्प बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांना सादर केला. मात्र अर्थसंकल्पात बेस्टच्या तिकिट दरात आणि मासिक पासात भाडेवाढ सुचवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा बेस्ट प्रवास महागण्याची शक्यता आहे. त्याचा फटका शालेय विद्याथ्यांनाही सहन करावा लागणार आहे. मात्र या भाडेवाढीला समितीची आणि महापालिकेची मंजुरी मिळाल्यानंतरच १ एप्रिलपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे.
बेस्टचा सन २०१८-१९ या वर्षासाठीचा ५८२४ कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात बसच्या तिकीट भाड्यात १ ते १२ रूपये भाडेवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. पहिल्या ४ किमी पर्यंतचे भाडे कायम ठेवण्यात आले असून, त्यापुढील प्रत्येक टप्प्यासाठी १ ते १२ रूपयांपर्यंत भाडेवाढ प्रस्तावीत करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी बेस्टच्या ६०० हून अधिक बसेसची आयुमर्यादा संपुष्टात येत असल्याने, बेस्टने तब्बल ८०० खासगी बस भाडेतत्त्वावर घेऊन चालवण्याचे प्रस्तावित केले आहे. यात मिनी एसी बस, मिनी बस, विकलांगांसाठी खास बसेसचा समावेश आहे.
अशी असेल भाडेवाढ
अंतर आताचे भाडे (रुपये) प्रस्तावित (रुपये)
२ किमी ८ ८
४ किमी १० १०
६ किमी १४ १५
८ किमी १६ १८
१० किमी १८ २२