म्हाडाचा कासवगती कारभार : तीन वर्षे होऊनही लाभार्थी हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत !
डोंबिवली : डोंबिवलीनजीक असलेल्या खोणी परिसरात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत म्हाडाचा प्रकल्प सुरु आहे. ९ ऑगस्ट २०२१ रोजी घराचा ताबा देण्याचे पत्र म्हाडाने दिल आहे. मात्र अजूनही घर मिळण्यासाठी लाभार्थ्यांना २ वर्ष वाट पाहावी लागणार आहे. लाभार्थ्यानी ९० ते १०० टक्के रक्कम भरूनही हक्काच्या घरासाठी तब्बल ५ वर्षे वाट पाहावी लागणार असल्याने लाभार्थी मेटाकुटीला आले आहेत. एकीकडे राहत्या घराचे भाडे आणि बँकेचा हप्ता भरावा लागत असल्याने रविवारी शेकडो लाभार्थी म्हाडा विरोधात रस्त्यावर उतरून त्यांनी रोष व्यक्त केला.
म्हाडाच्या प्रकल्पातर्गत १६ इमारती उभारल्या जात आहेत. या प्रकल्पात जवळपास एक हजार लाभार्थी आहेत.२०१८ साली अत्यल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना या ठिकाणी घराची लॉटरी लागली होती. २०२१ पर्यंत घराचा ताबा दिला जाणार होता. मात्र मुदतीत काम पूर्ण झालेले नाही. मात्र अजून २ वर्ष थांबावे लागेल असे म्हाडाकडून सांगितले जात असल्याने लाभार्थी संतप्त झाले आहेत. घराचे सगळे हप्ते भरल्यानंतरही ताबा मिळालेला नाही. आम्ही सर्वसामान्य लोक आहोत, घराचे भाडे, बँकेचा हप्ता कसा भरणार ? असा प्रश्न त्यांच्यापुढं उभा आहे. त्यामुळे म्हाडा प्रशासनाने राहत्या घराचे आठ हजार रुपये भाडे द्यावे. अन्यथा शेवटचा घराचा १ लाख ६१ हजार रुपयांचा हप्ता माफ करण्यात यावा तसेच ज्यांनी हप्ता भरला आहे, त्यांना परत करण्यात यावा अशी मागणी लाभार्थीकडून करण्यात आली
.——-