नौदलाचा ‘बिटींग द रिट्रिट’ सोहळा जलधारांनी रंगला..
मुंबई : फेसाळत्या समुद्रलाटांच्या साथीने व कोसळत्या जलधारांनी नौदलाचा बिटींग द रिट्रीट हा सोहळा गेट वे ऑफ इंडियाच्या प्रांगणात उत्तरोत्तर रंगत गेला. भर पावसातही राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्यासह नौदल अधिकारी, मान्यवर पाहुणे व उपस्थित पर्यटकांनी या सोहळ्याचा मनसोक्त आनंद लुटला.
नौदलाचा बिटींग द रिट्रिट व टॅटो सेरिमनी या कार्यक्रमाचे आयोजन आज गेट वे ऑफ इंडिया येथे केले होते. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी नौदलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय, गेट वे येथे फिरायला आलेले पर्यटक उपस्थित होते. राज्यपाल विद्यासागर राव यांचे आगमन झाल्यानंतर नौदलाच्या वाद्यवृंदांने आपल्या अनोख्या सुरील्या बँडने त्यांचे स्वागत करण्यात आले. वादनाबरोबरच त्यांच्या लयबद्ध कवायतींनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. याचवेळी आयएनएस शिक्रा येथून उड्डाण केलेल्या हेलिकॉप्टरनी सलामी दिली. तसेच त्यानंतर के22 या नौदलाच्या तुकडीने तसेच नौदल कॅडेटनी बँडच्या तालावर कवायती सादर केल्या. समारंभ सुरू झाल्यानंतर पाऊस पडू लागला. भर पावसात उपस्थित मान्यवरांसह पर्यटकांनी या अनोख्या सोहळ्याचा आनंद लुटला.