राजभवनातील पर्यटकांचा प्रवास आता बॅटरीच्या वाहनातून
एमटीडीसीतर्फे राजभवनात वाहन सुर्पूद
मुबंई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) राजभवनात येणाऱ्या पर्यटकांसाठी बॅटरीवर चालणारे वाहन देण्यात आले आहे. पर्यटकांचा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित होण्याकरीता हे पाऊल उचलण्यात आले आहे. राजभवन पाहण्याकरीता येणारी पर्यटकांची वाढणारी संख्या पाहता पर्यटकांसाठी आकर्षण असलेले हे ठिकाण अधिक विकसित करण्यासाठी सरकारतर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत.

राजभवन हे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे अधिकृत निवासस्थान आहे. सर्वांना हे ठिकाण पाहता यावे यासाठी आठवड्यातील 6 दिवस या वारसा स्थळाची कवाडे खुली केली जातात. ही दोन तासांची भ्रमंती असून या सहलीत राजभवनात फेरफटका मारला जातो. राजभवनात पर्यावरणस्नेही भ्रमंती करण्यासाठी बॅटरीवर चालणारे हे वाहन नक्कीच उपयुक्त ठरेल. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे काही नैसर्गिकदृष्ट्या संवेदनशील ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. थंड हवेची ठिकाणे, किनारपट्टीवरील ठिकाणे आणि तीर्थस्थळांचा यात समावेश असून या ठिकाणी डिझेल किंवा पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांना परवानगी देण्यात येणार नाही. केवळ बॅटरीवर चालणारी किंवा ई-वाहनानांचा या ठिकाणी परवानगी देण्यात येईल जेणेकरून या ठिकाणी शून्य प्रदूषण होईल. राज्य सरकारतर्फे काही शहरे ही सायकलिंग हॉटस्पॉट म्हणून विकसित करण्यात येणार आहे आणि पर्यावरणस्नेही पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे.   पर्यटनमंत्री  जयकुमार रावल म्हणाले की, “पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि मुंबईतीली हे वारसा स्थळ अधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राजभवनाकडे बॅटरीवर चालणार वाहन सुपुर्द करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. मलबार हिल येथील राजभवन हे राज्यपालांचे निवासस्थान पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण आहे आणि महाराष्ट्राला पर्यावरणस्नेही पर्यटन ठिकाणात परिवर्तीत करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. वाढत्या पर्यटकांच्या मागण्या पुरविण्याच्या दृष्टीने एमटीडीसीकडून घेण्यात आलेले हे छोटेसे पाऊल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!