मुंबई : बारामती लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या सामना होत आहे. त्यामुळे पवार कुटूंबियांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे त्यातच आता सुनेत्रा पवारांकडून सुप्रिया सुळे यांनी ८० लाखाचे कर्ज घेतल्याचे समोर आले आहे.
विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी सादर केलेल्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांचेही २० लाख रुपये देणे बाकी आहे, असे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
सुप्रिया सुळे यांनी सादर केलेल्या माहितीनुसार त्यांची आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांची एकूण जंगम मालमत्ता ११४ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सुनेत्रा पवार यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात जंगम मालमत्तेचे मूल्य १२,५६,५८,९८३ रुपये, तर स्थावर मालमत्तेचे मूल्य ५८,३९,४९,७५१ रुपये आहे. सुप्रिया सुळे यांच्याशिवाय सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनाही ५० लाख रुपये दिले आहेत.
सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघींनीही गुरुवारी बारामती लोकसभेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर दोन्ही उमेदवारांच्या सभा झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सुनेत्रा यांच्या रॅलीत सहभागी झाले होते. त्याचवेळी सुप्रिया सुळे यांच्या सभेला शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सचिन अहीर उपस्थित होते. बारामती लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे.