बारामती : शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा बारामती मतदार संघातील लोकसभा निवडणुकीतील रंगत दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पुतणे अजित पवार यांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडीत पक्ष हायजॅक केल्यानंतर आता बारामती मतदार संघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा  पवार असा नणंद विरूद भावजय असा सामना रंगणार आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करूनही शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे हे बारामती लढण्यावर ठाम असून, येत्या बारा तारखेला, बारा वाजता फॉर्म भरणार आणि पवारांचे बारा वाजवणार अशी गर्जना शिवतारेंनी केली आहे. त्यामुळे बारामतीत कुणाचे बारा वाजणार अशीच चर्चा रंगली आहे. 

विजय शिवतारे यांनी बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी हट्ट साडलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारेंची मनधरणी करूनही शिवतारे अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.  शिवतारेंनी कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि दि १ एप्रिलपासून प्रचाराला सुरूवात करणार असल्याचं सांगितलं. मला बारामतीतूनच नाही तर महाराष्ट्रातून फोन येत आहेत. काहीजण म्हणतात मी शरद पवारांचा हस्तक झालोय. पण मी घराणेशाही आणि झुंडशाहीच्या विरोधात लढतोय, असं विजय शिवतारेंनी म्हटलं. त्यावेळी ‘बारा तारखेला बारा वाजता फॉर्म भरणार आणि पवारांचे बारा वाजवणार’, असं म्हणत शिवतारेंनी दंड थोपटले आहेत.

दरम्यान, अजित पवारांची पत्नी म्हणून आम्ही मतदान का करायचं? अशी विचारणाही त्यांनी केली. 2024 ची विधानसभा हे सगळे वेगळे लढतील असाही दावा त्यांनी केला. अजित पवार हे जिंकू शकत नाहीत असंही ते म्हणाले. या लढाईत मी विभीषण आहे तर रावण कोण असेल हे सगळ्यांना माहीत आहे असं म्हणत अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधला होता. बारामतीत लोकशाहीला मानणाऱ्या आणि घराणेशाही, कुटुंबशाही, साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्यांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी मी ही निवडणूक लढणार म्हणजे लढणार असा निर्धार विजय शिवतारे यांनी व्यक्त केला होता.

काका पुतण्याच्या राजकीय वजनाची कसोटी

बारामतीतून सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार घोषित झाल्यानंतर ही लढाई केवळ ‘सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे’ अशी राहणार नसून, ‘अजित पवार विरुद्ध शरद पवार’ असेल. शिवाय,   काका-पुतण्या जोडीच्या राजकीय वजनाची कसोटी लागणार आहे. सुप्रिया सुळेंच्या जय-पराजयाच्या निमित्तानं शरद पवारांची होमग्राऊंडवरील ताकद उरलीय की नाही, ते ठरेल आणि सुनेत्रा पवारांच्या जय-पराजयानं अजित पवारांची होमग्राऊंडवर पकड किती, हे ठरेल.

 बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. या विधानसभा मतदारसंघांमधील विद्यमान आमदारांचा कल पाहिल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पूरक वातावरण दिसून येतं. दौंडमध्ये भाजपचे राहुल कूल, इंदापुरात अजित पवार गटाचे दत्तात्रय भारणे, बारामतीत स्वत: अजित पवार, खडकवासल्यात भाजपचे भीमराव तपकीर आमदार आहेत. म्हणजेच, सहापैकी चार आमदार अजित पवार जो उमेदवार देतील, त्याच्या बाजूने असतील. पुरंदर आणि भोरमध्ये अनुक्रमे संजय जगताप आणि संग्राम थोपटे हे काँग्रेसचे आमदार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातली आमदारांची ताकद सुप्रिया सुळेंच्या विरोधात असल्याचं आकडेवारीवरून दिसून येतय. मात्र, या मतदारसंघातील भाजपचा मतदार ‘घड्याळा’वर मत देईल का, याबाबत अनेकांना शंका वाटते. तरीही भाजप या मतदारांना कशाप्रकारे सुप्रिया सुळेंविरोधात मत देण्यास तयार करते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

 सुनेत्रा पवारांचा जय किंवा पराजय हा अजित पवारांचा जय-पराजय असेल, त्यामुळे अजित पवार त्यांची राजकीय ताकद पणाला लावतील, यात शंका नाही आणि अजित पवारांच्या या ताकदीला सुप्रिया सुळे कशा पद्धतीने आव्हान देतील. शरद पवार लेकीसाठी काय खेळी खेळतात हे पाहावं लागणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *