ठाणे : गेल्या २३ वर्षापासून स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत मेसेंजर (संदेशवाहक) पदाची भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे कर्मचा-यांना अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे. त्यामुळे बँकेत मेसेंजर पदाची तातडीने भरती करण्यात यावी अशी मागणी स्टेट बँक कर्मचारी सेनेने बँकेचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
१९९७ पासून बँकेत मेसेंजर पदाची भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे इतक्या वर्षात २५ टक्के कर्मचारी निवृत्त झाले ओहत तर २५ टक्के कर्मचा-यांना बढती मिळाली आहे. त्यामुळे सध्या उर्वरित ५० टक्के कर्मचा-यांना कामाचा ताण सहन करावा लागत आहे. कामाच्या वेळेपेक्षा जास्त काम करावे लागत असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर व मानसिकतेवर होत आहे. त्यामुळे मेसेंजर पदाची तातडीने भरती करण्यात यावी यासाठी स्टेट बँक कर्मचारी सेनेचे अध्यक्ष सुभाष महाजन, सरचिटणीस हेमंत रासम यांनी बँक प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे.
———–