वांद्र्यात अग्नितांडव, २ जण जखमी
मुंबई (प्रतिनिधी)- वांद्रे पूर्व येथील गरीब नगर- बेहराम पाडा झोपडपट्टीला गुरुवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. अनेक झोपड्या या आगीत जळून खाक झाल्या. या घटनेत अग्निशमन दलाच्या जवानांसह अन्य १ जण जखमी झाले. अरविंद घाडे (४३) व रिझवान सय्यद (४१) अशी या घटनेतील जखमींची नावे आहेत.. जखमींवर भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या आगीच्या घटनेचा रस्ते व हार्बर मार्गावरील रेल्वेसेवेवर परिणाम झाला. यावेळी हार्बर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान, रोद्ररुप धारण केलेल्या अागीवर तब्बल साडेचार तासांनी अग्निशमन दलाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर नियंत्रण मिळवले. विभाग कार्यालयामार्फत येथील अतिक्रमण हटविण्याचे काम सुरु असताना सिलेंडर स्फोट होऊन आग लागल्याचे सांगण्यात आले.
वांद्रे येथील गरीब नगर, बेहरामपाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. अनेक झोपड्यांवर बेकायदेशीरपणे मजल्यांवर मजले चढविण्यात आले आहे. दाटीवाटीची वस्ती असलेल्या या भागात महापालिकेचे अतिक्रमण हटविण्याचे काम सुरु होते. या कारवाई दरम्यान दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी सिलिंडरचा भडका उडून आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे हाहाकार माजला. झोपडपट्ट्यातील व आजूबाजूच्या वसाहती, शासकीय कार्यालये आदी मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असलेल्या भागात घबराट निर्माण झाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे काम हाती घेतले. मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केल्याने अनेक झोपड्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. एकमेकांना खेटून असलेल्या झोपड्यांमुळे आग पसरु लागली. यामुळे ३.३१ ला लेव्हल २, ३.४९ वाजता लेव्हल ३ बोलविण्यात आली. मात्र, आगीचा दाह प्रंचड असल्याने ४ वाजून २० मिनिटांनी लेव्हल ४ ची कुमक मागविण्यात आली. १० वाटर टँकर, १६ फायर इंजिन तसेच रुग्णवाहीका घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र प्रचंड धुर, दाटीवाटीने वसलेल्या झोपड्या तसेच अरुंद रस्ते यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे अग्निशमन दलाच्या जवानांना मोठे अवघड झाले होते. सांयकाळी ७ वाजून १८ मिनीटांनी आग विझवण्यास अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. रस्ते व मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूकीला या आगीचा फटका बसल्याने काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्ण बंदपणे करण्यात आली होती, अशी माहिती पालिका आपत्कालीन विभागाने दिली.