मुंबई : . जगभरात मतपत्रिकेवर निवडणुका होत आहेत. मग भारतात ईव्हीएमवर निवडणूक घेण्याचा अट्टाहास का, असा सवाल संजय राऊत यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून सरकारला विचारला. आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेतल्यास ३३ कोटी देव काय प्रभू श्रीराम सुध्दा वाचवणार नाहीत असा टोलाही राऊत यांनी भाजपला ठणकावले

पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या पथकावर जमावाने हल्ला केला. भविष्यात देशातील शासकीय तपास यंत्रणा आणि ईव्हीएम विरोधात जनता रस्त्यावर उतरेल, असे राऊत यांनी सांगत जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात मतदान प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास उडाल्याचे म्हटले. लोकशाहीच्या नावाने एकप्रकारे हुकूमशाही लादली जात आहे का, असा सवाल केला. एकीकडे भाजप नेते जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे. मोदी विश्वगुरू आहेत. प्रभू श्रीराम यांना घर देण्याची ताकद मोदींमध्ये आहेत, असे म्हणतात. मात्र, मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यास घाबरतात. जर मतप्रत्रिकेवर निवडणुका झाल्या तर भाजपावाले ग्रामपंचायती आणि नगरपालिकेच्या निवडणुकाही जिंकू शकणार नाहीत. भाजपला यावेळी ३३ कोटी देव काय प्रभू श्रीराम सुध्दा वाचवणार नाही, असा हल्लाबोल राऊत यांनी केला. तसेच जगभरात आजच्या घडीला कुठेही ईव्हीएमद्वारे निवडणूक घेतली जात नाही. अमेरिका, युरोप, रशिया, किंवा मोदींच्या प्रिय इस्रायल मध्ये ही ईव्हीएमवर निवडणूक घेतली जात नाही. मग भारतात ईव्हीएमचा अट्टाहास का? अशा प्रश्नांची सरबत्ती करत भाजपची कोंडी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या पंतप्रधानांच्या प्रेमात आहेत. २५ वर्षापूर्वी आम्ही भाजपच्या प्रेमात होतो. आता आमचा प्रेमभंग झाला असा खोचक टोला राऊत यांनी यावेळी लगावला. येत्या निवडणुकांच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. वंचित आमचा घटक पक्ष असून त्यांच्या सोबत बोलणी सुरू आहेत. कॉंग्रेस आघाडीतील मोठा पक्ष असून जागा वाटपाचा फॉर्म्युला तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते जाहीर करतील. भाजपला यावेळी कोणीही मागच्या दाराने मदत करणार नाही, असे राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *