मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज पहाटे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 86 वर्षांच्या जोशी यांना गुरुवारी रात्री अत्यवस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. संध्याकाळी 5 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसस्कार करण्यात आले.
मनोहर जोशी यांना याआधी ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता. त्यावेळी जवळपास महिनाभर जोशी यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. काल त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मनोहर जोशी यांची बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख होती. रायगड जिल्ह्यातील नांदवी गाव हे त्यांचे जन्मगाव. माधुकरी मागून त्यांनी
आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबईतून येऊन ‘कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्युट’ची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यावर पहिल्या फळीतील शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर 1976 मध्ये मुंबईचे महापौर, मार्च 1990 ते डिसेंबर 91 विधानसभेचे विरोधी पक्षनेते, मार्च 1995 ते जानेवारी 1999 या काळात राज्याचे मुख्यमंत्री, ऑक्टोबर 99 ते मे 2002 केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, मे 2002 ते ऑगस्ट 2004 लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास
चढता राहिला. मुख्यमंत्री असताना आपल्या जावयाला भूखंडाचा लाभ मिळवून दिल्याचे आरोप त्यांच्यावर झाले. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. मनोहर जोशी गेली काही वर्षे सक्रिय राजकारणापासून दूर होते.
अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील त्यांच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ठेवण्यात आले होते. यावेळी दुपारी 2 वाजल्यानंतर त्यांची अंत्ययात्रा निघाली. अंत्यसंस्काराला उद्धव ठाकरे, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते आणि मंत्री शंभुराज देसाई उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!