नाशिक : मागील तीन चार दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तूर, कापूस, कांदा सोयाबीन या पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदर खरीप वाया गेले, बहुतांश भागात रब्बीच्या पेरण्या झाल्या नाहीत. अनेक ठिकाणी पिकं करपून गेली आहेत. त्यातच आता अवकाळी पाऊस आणि गारपिटीने उरले सुरली पिकं आणि फळबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे सरकारने आता पंचनामे, पाहणी निकष यात न पडता शेतक-यांचे जेवढे नुकसान झाले आहे तेवढी मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. सरकारने शेतक-यांना मदत करण्यास चालढकल केली तर हिवाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरू असा इशारा थोरात यांनी दिला.
आ. थोरात यांनी आज अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि चांदवड तालुक्यातील गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली व शेतक-यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, राज्यातल्या बहुतांश भागात दुष्काळ आहे. अनेक ठिकाणी रब्बीच्या पेरण्या होऊ शकल्या नाहीत. अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. या संकटामुळे अगोदरच शेतकरी अडचणीत असताना आता झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकरी उद्धवस्त झाला आहे. नाशिक जिल्हाला या गारपिटीचा मोठा फटका बसला असून एकट्या नाशिक जिल्ह्यात ३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकं आणि फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत. मका, सोयाबीन, धान, कांदा, टोमॅटो, कांदा रोपवाटीका, ज्वारी, द्राक्षे यासह फळबागा गारपीटीने नष्ठ झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी कोलमडून पडला आहे. बँकांकडून कर्ज घेऊन शेतक-यांनी या बागा जगवल्या होत्या. त्याला आधाराची आणि मदतीची गरज असून सरकारने पंचानामा, पाहणी, निकष याचे कागदी घोडे न नाचवता शेतक-यांचे जेवढे नुकसान झाले आहे तेवढी मदत तात्काळ द्यावी असे थोरात म्हणाले.