मुंबई : शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चांगलीच टोलेबाजी रंगल्याचे दिसून आले. ठाकरे व शिंदे यांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही.

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण कार्यक्रम विधिमंडळात पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांचे विचार ऐकताना ताकद आणि उर्जा येते. अन्याविरोधात लढण्याचं बळ मिळतं. जिथे अन्याय होतो, तिथे पेटून उठा, सहन करु नका, अन्यायविरुद्ध लढा ही बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे. बाळासाहेब म्हणायचे शंभरवेळा विचार करुन शब्द द्या. तेच आम्ही बाळासाहेबांकडून शिकलो. बाळासाहेबांनी धाडस करण्याची शिकवण दिली, त्याचे महाराष्ट्रात पडसादही उमटले. शेवटी धाडस करण्याला हिंमत आणि ताकद लागते, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे लगावला.

बाळासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आम्ही काम करतोय. बाळासाहेब हे रिमोट कंट्रोल होते. पण, ते रिमोट कंट्रोल सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी चालवायचे. स्वत:ला काही पाहिजे म्हणून कधी रिमोट कंट्रोल चालवला नाही. बाळासाहेबांनी सत्ता, मुख्यमंत्रीपदासाठी विचारांशी कधी तडजोड केली नाही असा टोलाही शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

उध्दव ठाकरेंची मोदी- शिंदे गटावर टीका

मुंबईतील माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक जिंकायची असेल तर बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही हे आजही सत्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ते मान्य आहे. त्यामुळेच तर खोकेवाले बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरत आहेत. आज तुम्हाला आव्हान देतो जर हिंमत असेल तर निवडणुका घ्या. आम्ही बाळासाहेबांचा फोटो घेऊन येतो. तुम्ही मोदींचा फोटो घेऊन या. बघू लोक कुणाला मत देतात? असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही त्यांनी आज निशाणा साधला. तसंच शिंदे गटाला मिंधे गट असं म्हणत टीका केली.

दोन-तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येऊन गेले. त्यावेळी त्यांनी काही कामांचं उद्धघाटन केलं. परंतु, आम्ही सुरू केलेल्याच कामांच उद्घाटन त्यांनी केलं. पंतप्रधान उद्या येणार म्हणून रात्री ही कामं सुरू झाली नाहीत. गेले तीन वर्षे आम्ही ही कामं करत होतो म्हणून तुम्ही आता त्याचं उद्घाटन करून गेले, अशी टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *