बाळासाहेबांचा पाचवा स्मृतीदिन…. स्मृतीस्थळाच्या दर्शनासाठी शिवसैनिकांची रिघ

शिवसेनेकडून शेतकरी सहाय्यता निधीसाठी दोन कोटी रुपयांचा धनादेश : उध्दव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्क दादर येथे राज्यभरातून शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाच्या दर्शनासाठी शिवतीर्थावर आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत  बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक संकेतस्थळाचे लोकार्पण  करण्यात आले. तसेच शिवसेनेकडून मुख्यमंत्री शेतकरी सहाय्यता निधीसाठी दोन कोटी रुपयांचा धनादेश शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा देण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. सरकार त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिल. महापौर बंगल्यात छोटेखानी कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आल होत. सकाळपासूनच राज्याच्या कानाकोपर्‍यातून शिवसैनिकांनी शिवाजी पार्कवर गर्दी केली होती. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे सहकुटुंब बाळासाहेबांना अभिवादन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार सर्वश्री संजय राऊत, चंद्रकांत खैरे, विनायक राऊत, पुनम महाजन, आमदार सुनील राऊत, आदींनीही बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले. बाळासाहेबांना श्रद्धांजली देण्यासाठी शिवाजीपार्कवर बाळासाहेब ठाकरेंचं वाळू शिल्प म्हणजेच सॅण्ड आर्ट तयार केलं होत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *