ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बालमृत्युच्या कारणांचा शोध घेऊन बालमृत्यूस कारणीभूत असलेल्या घटकांचा नायनाट करून जिल्हयातील बालमृत्यु रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाने ‘बालसंजीवनी’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या अभियानात जोखमीच्या गरोदर व स्तनदा मातांचे स्तनपान, आहार, व्यायाम त्याच बरोबर गर्भधारणा झाल्यावर बाळाचे पहिले एक हजार दिवसाचे नियोजनाबाबत समुपदेशन,मार्गदर्शन करण्यात येणार. मातेसह कुटुंबाला देखील या अभियानात सहभागी करण्यात येणार आहे.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी महिला व बाल कल्याण समिती सभापती श्रेया गायकर यांच्या मान्यतेने या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा परिषदेतंर्गत महिला व बाल विकास विभाग व आरोग्य विभागाने संयुक्तपणे हे अभियान राबविण्यात येत असून सदयस्थितीत ग्रामीण क्षेत्रातील बालमृत्यूचे वाढते प्रमाण पाहता बालमृत्यूला आळा घालणे आवश्यक आहे. ठाणे जिल्हयातील बालमृत्यूचे प्रमाण राज्याच्या बालमृत्यूच्या प्रमाणापेक्षा कमी आहे. हे प्रमाण अजून कमी करून देशाची भावी पिढी जतन करण्याचा या अभियानाचा उद्देश असून पर्यायाने लिंग गुणोत्तर वाढण्यसही मदत होणार असल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बाल विकास) संजय बागुल यांनी सांगितले.

असे आहे अभियानाचे स्वरूप

अंगणवाडी केंद्रातील 0 ते 6 वर्ष वयोगटातील सर्व बालकांची अभियान कालावधीमध्ये 100 % तपासणी करून प्रामुख्याने 3 वर्ष वयोगटाखालील बालकांना मेंदुत ताप जावून झटके येणे,न्यूमोनिया,अतिसार,काविळ यामुळे बालमृत्यु होत असलेने त्याबाबत विशेष लक्ष देवून कमी वजनाच्या बालकांची दर साप्ताहिक /पाक्षिक आरोग्य तपासणी करणे. बालकांना आरोग्य तपासणी दरम्यान आवश्यकतेप्रमाणे संदर्भ सेवा (वजनवाढीचे टॉनिक ,औषधे,जंतनाशके व इतर पूरक) देऊन पूढील तीन महिन्यातील बालकांच्या वजन वाढीबाबत सूक्ष्म नियोजन करून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कृती आराखडा तयार करणे.

दिनांक 22 नोव्हेंबर 2021 ते 05 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये विशेष तपासणी कँपचे आयोजन करून प्रकल्पक्षेत्रातील सँम (SAM), मम् (MAM) दुर्धर बालकांची आरोग्य तपासणी करून घेणे तसेच दूर्धर आजारी बालकांना आवश्यकतेप्रमाणे पुढील शस्त्रक्रीया व संदर्भ सेवा देणेबाबात नियोजन करणे. गरोदर महिलेच्या प्रति तिमाही वजनात होणारी वाढ, हिमोग्लोबिन तपासणी आवश्यकतेप्रमाणे थॉयरॉईड व इतर तपासण्या करणे.

अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांचे सहकार्य

अंगणवाडी सेविका व आशा वर्कर त्यांचे सर्व्हेक्षण क्षेत्रातील सर्व स्त्रियांची नोंदणी करून जोखमीच्या गरोदर मातांची यादी आरोग्य सेविकांच्या मदतीने तयार करणार आहेत. गर्भवती मातेस व तिच्या कुटुंबियांना मातेचा आहार, व आरोग्य विषयक मार्गदर्शन करून आहार कसा असावा, हलका व्यायाम कोणता करावा,लसीकरण, HB तपासणी , गरोदरपणातील वजनवाढ , विश्रांती याबाबत मार्गदर्शन व समुपदेशन करून गर्भवती मातेचा आहार पोटभरीचा नसून पौष्टीक असावा याबाबत आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी मार्गदर्शन करून शंकासमाधान करणार आहेत.

ग्रामपंचायत व कर्मचाऱ्यांचा होणार सन्मान

अभियान कालावधीत बालमृत्युचे प्रमाण कमी असणा-या ग्रामपंचायतींचा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांचा सत्कार दिनांक 26 जानेवारी 2022 रोजीच्या ग्रामसभेमध्ये करून संबंधित अंगणवाडी सेविका, आशा वर्कर ,आरोग्य सेविका व वैदयकीय अधिकारी यांचा त्यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *