बदलापूर रेल्वे स्थानक झाले १६१ वर्षांचे : रोटरीने केले फलाटावर सुशोभिकरण

बदलापूर: बदलापूर रेल्वे स्थानकाने बुधवारी १६१ व्या वर्षात पर्दापण केले, याच पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरियाच्या वतीने स्थानक परिसरात सुशोभिकरण करण्यात आले.विशेष म्हणजे टाकाऊ वस्तूंपासून हे सुशोभिकरण करण्यात आले असून हे सुशोभिकरण रेल्वे प्रवाशांचे आकर्षण ठरले आहे.
उल्हासनदीच्या तीरावर वसलेले बदलापूर हे छोटेसे गाव होते. माथेरान येथे दळणवळणासाठी सोयीचे व्हावे म्हणून इंग्रजांनी मिनी ट्रेन सुरू केली होती. ही ट्रेन कोळशावर चालत असे. त्या काळात बदलापूर रेल्वे स्थानकालगत अनेक विहिरी होत्या त्या विहिरीतील पाणी मालगाडी,कोळशाचे इंजिन यांच्यासाठी वापरले जाई,असे येथील वयोवृद्ध लोक सांगतात. १ नोव्हेंबर १८५६ रोजी बदलापूर रेल्वे स्थानकाचे उद्घाटन झाले होते. या घटनेला १६० वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरियाच्या वतीने बदलापूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक तिनवरील स्टेशन मास्टर कार्यालयालगतच्या जागेत सुशोभिकरण केले आहे. त्यामध्ये रेल्वे इंजिनच्या प्रतिकृतीसह बुद्धिबळ पट, सापशिडीचा पट, ऑनलाइन स्टेशन, मोबाईल झोन, सायकल व उद्यानाची आकर्षक प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. आजची तरुण पिढी मोबाईल व संगणकात गुरफटल्याने त्यांना पूर्वीच्या लोकांप्रमाणे  खेळण्यातले जगणे अनुभवता येत नसल्याचा संदेश या प्रतिकृतींमधून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे रिकामे पिंप त्याची झाकणे, भांडी घासण्याच्या तारेचा काथ्या व इतर टाकाऊ वस्तूंचा कल्पकतेने वापर करून आकर्षक अशा या प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. बुधवारी सकाळी रोटरीचे पदाधिकारी तसेच रेल्वे व आरपीएफ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या प्रतिकृतींचे उदघाटन करण्यात आले.यावेळी अनेक प्रवाशांनी या प्रतिकृतींसह सेल्फी घेऊन आनन्द व्यक्त केला. तर काहींनी महिला डब्याच्या समोरील जागेत हे सुशोभिकरण करण्यात आल्यामुळे उभे राहण्याची व बसण्याची जागा कमी झाल्याने गर्दीच्या वेळी महिलावर्गाची गैरसोय होणार असल्याचे मत व्यकत केले.
आजपासून नवीन लोकल
दरम्यान, बुधवारपासून सकाळी ८.४५ वा ची बदलापूर- दादर ही नवीन लोकलही सुरू करण्यात आली असून या लोकलचे तीन डब्बे महिलांसाठी राखीव आहेत.
 सोयीसुविधा मिळाव्यात
बदलापूर रेल्वे स्थानकाने १६१ व्या  वर्षात पदार्पण केले असून सद्यस्थितित या स्थानकातून रेल्वेला चांगले उत्पन्नही मिळत आहे. त्यामुळ होम प्लॅटफॉर्मसह इतर अधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी रेल्वे प्रवाशांची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *