सावधान  !  वाहने सावकाश चालवा, पुढे सार्वजनिक बांधकाम मंत्री खड्डयात बसलेत 

बदलापूरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि  मनसेचे संयुक्त आंदोलन 

बदलापूर: अंबरनाथ- बदलापूर  रस्त्यावरील खड्ड्यामुळे  नागरिक कमालीचे हैराण झाले असून अपघातांची संख्या वाढत आहे. 15 डिसेंबरपूर्वी राज्यातील रस्त्यांवरील खड्डे न बुजविल्यास मी स्वत: रस्त्यात खुर्ची टाकून बसेन अस आश्वासन सार्वजनिक बांधकाम तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेने संयुक्तपणे आंदोलन करीत रस्त्यावरील एका खड्डयात खुर्ची टाकून सार्वजनिक बांधकाममंत्रयांचा  प्रतिकात्मक पुतळा बसवून निषेध केला. सावधान, वाहने सावकाश चालवा, पुढे सार्वजनिक बांधकाममंत्री खड्डयात बसलेत. शेवटी खड्डयात बसलोच अशा आशयाचे फलकही मनसेकडून लावण्यात आले होते.

कुळगाव बदलापूर नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आशिष दामले, अविनाश देशमुख, मनसेचे शहराध्यक्ष उमेश तावडे, संगीता चेंदवनकर यांच्यासह मनसे व राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.  अंबरनाथ बदलापूर रस्त्यावरील एका खड्डयात खुर्ची  एक कापडाचा पुतळा बसवून,  त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मुखवटा लावण्यात आला होता. अखेर खड्डयात बसलोच, अशी घेाषणाबाजी मनसे कार्यकत्यांकडून सुरू होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने एक फलक लावण्यात आला होता. त्यावर ‘सावधान वाहने सावकाश चालवा, पुढे महाराष्ट्राचे महसूल मंत्री खड्ड्यात बसलेले आहेत असे लिहिले होते. सरकारकडून फसव्या घोषणाबाजी केल्या जात असल्याचा निषेध राष्ट्रवाद कडून करण्यात आला.  गेल्या अनेक दिवसांपासून अंबरनाथ- बदलापूर रस्त्यावर डी मार्टजवळ मोठा खड्डा तयार झाला आहे. गतिरोधकाच्या जवळच असलेल्या या खड्ड्यामुळे वाहन चालकांना वाहने चालवताना गैरसोयीचे ठरत आहे. त्यामुळे या रस्त्यावर एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भात नागरिकांकडून सोशल मीडियावर तीव्र नाराजीही व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या होत असलेल्या या गैरसोयीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *