बदलापुरच्या माघी गणेशोत्सवाचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष
 नितीन देसाईंच्या संकल्पनेतून साकारतेय महालाची प्रतिकृती

बदलापूरः बदलापूरच्या प्रसिद्ध माघी गणेशोत्सवाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. २१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या उत्सवाची तयारी जवळपास पूर्ण झाली असून ख्यातनाम कला कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून साकारलेला महाल यंदा या उत्सवाचे आकर्षण ठरणार आहे.
अंबरनाथ ते मुरबाड पट्ट्यात पौष पौर्णिमा ते माघी गणेशोत्सव काळात विविध जत्रांचे आयोजन केले जाते. यात बदलापूरच्या स्टेशनपाड्याची माघी गणेशोत्वाची जत्रा प्रसिद्ध आहे. यंदा या माघी गणेशोत्सवाचे पन्नासावे वर्ष असून त्यानिमित्ताने  दहा दिवसांच्या या उत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल  असणार आहे. कला दिग्दर्शनात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणारे एन.डी स्टुडियोचे नितिन देसाई यांच्या संकल्पनेतून यंदा बदलापूरच्या गणेशोत्सवासाठी महल उभारला जाणार आहे. कोणत्याही अस्तित्वात असलेल्या महलाची प्रतिकृती न करता एका वेगळ्या संकल्पनेतून स्टेशनपाडा येथे सध्या भव्य महल उभारणीचे काम सुरू आहे. या महलाच्या प्रतिकृतीत गणेश भक्तांना फिरता येणार असून त्यासाठी विशिष्ट प्रवेशाची सुविधा केली जाणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष उल्हास आंबवणे व खजिनदार  योगेश धोत्रे यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात थाटामाटात साजरा केला जाणार आहे. मात्र सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने मुरबाड, कर्जत ते थेट मुंबईपासून येणाऱ्या भक्तांच्या संख्येत यंदा वाढ होणार आहे. त्यामुळे दरवर्षीची कोंडी टाळण्यासाठी यंदा वेगळी व्यवस्था केली जाणार असून वाहतूकीवर परिणाम होऊ न देता उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न असल्याचे कार्याध्यक्ष विरेश धोत्रे यांनी सांगितले. तर यंदा सामाजिक दातृत्व ही संकल्पना घेत येत्या उत्सव काळात आणि वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे अविनाश खिल्लारे यांनी सांगितलेे. तर सुवर्ण महोत्सवी वर्षात देशभरातील विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मंडळाचे उपाध्यक्ष हरिश्चंद्र थोरात यांनी दिली.

 १०१ ढोल पथकांची मानवंदना
येत्या १९ जानेवारी रोजी गणेश आगमन होणार असून २१ जानेवारीला प्रतिष्ठापना होणार आहे. यावेळी १०१ ढोल पथकांची मानवंदना देण्यात येणार असून पारंपरिक पद्धतीने हि मिरवणूक होणार आहे. यात सर्व बदलापूरकरांनी सहभागी होण्याचे आवाहन उल्हास आंबवणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *