मुंबई : क्रिकेटचा देव समजला जाणारा भारतरत्न सचिन तेंडूलकर याच्या मुंबईतील घराबाहेर आज आंदोलन करण्यात आले आहे. ऑनलाईन गेमिंगची जाहिरात केल्याच्या निषेधार्थ प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेकडो कार्यकत्यांसह आंदोलन केलं. यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने सचिनच्या घराबाहेरील परिसर दणाणून गेला होता. देव आमचा जुगार खेळतो, परत करा, परत करा, भारत रत्न परत करा, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

सचिन तेंडुलकरने काही दिवसांपूर्वी ऑनलाईन जुगाराची एक जाहिरात केली होती. या जाहिरातीत सचिनने काम करण्यावर बच्चू कडू यांनी आक्षेप नोंदवला होता. ऑनलाईन गेमिंगच्या या जाहिरातीमुळे सचिन तेंडुलकरला मानणाऱ्या तरुणाईवर परिणाम होत असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला. त्यामुळे सचिन तेंडुलकरने एकतर ही जाहिरात सोडावी किंवा त्याला देण्यात आलेला भारतरत्न पुरस्कार तरी त्याने परत करावा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली होती. त्यांच्या मागणीनंतरही सचिनने कोणतंही पाऊल उचललेलं नव्हतं. अखेर आज बच्चू कडू यांनी सचिनच्या घराबाहेर आंदोलन केले.

बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकर यांना जाहिरात केल्याबद्दल जाहीर माफी मागण्याची मागणीही केली होती. पण सचिन यांच्याकडून कोणताच प्रतिसाद आला नाही. तसेच बच्चू कडू यांनी या प्रकरणात राज्य सरकारने हस्तक्षेप करून सचिन यांना या जाहिरातीतून माघार घेण्याची विनंती केली होती. पण राज्य सरकारनेही त्याकडे दुर्लक्ष केलं. राज्य सरकारच काही करत नसल्याने निराश झालेल्या बच्चू कडू यांनी आज अखेर त्यांच्या समर्थकांसह सचिन यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी जोरदार निदर्शने केली.

भारतरत्न पुरस्कार असलेल्या व्यक्तीने ऑनलाईन जुगाराची जाहिरात करणं योग्य नाही. प्रत्येक गणेश मंडळासमोर सचिन तेंडुलकर दानपेटी राहील. त्यातून जेवढा पैसा येईल, तेवढा गणेश विसर्जनाच्या दिवशी आम्ही सचिन तेंडुलकर यांना देऊ, असं म्हणत बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *