अमरावती : प्रहार संघटनेचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतच राहण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. असं असलं तरी अमरावतीमध्ये स्वतंत्र लढणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. आमचा वारंवार अपमानीत केलेल्या नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, असं बच्चू कडू यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना फोन करून मुंबईला भेटायला बोलावले आहे त्यामुळे मूुख्यमंत्री भेटीनंतर बच्चू कडू यांची तलावर म्यान होणार का ? कि बारामतीत विजय शिवतारें प्रमाणे ते सुध्दा आपल्या भूमिकेवर ठाम राहणार अशीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे,

बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे की, राणांनी आम्हांला वारंवार अपमानीत केलं, त्यामुळे कार्यकर्त्यांनी शरणागती पत्करण्याची मानसिकता नाही. आघाडीची उमेदवारी मागा पण, राणांचा प्रचार करायचा नाही, अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. सातत्याने कार्यकर्त्यांनी ही भूमिका मांडली असून पक्ष सोडण्याची भावनाही व्यक्त केली आहे. त्यामुळे आम्हाला निर्णय घ्यावा लागतोय. चांगल्या उमेदवाराच्या आम्ही शोधात होतो. आम्हांला भाजपमधीलच चांगला उमेदवार सापडला आहे.

आमदार बच्चू कडू अमरावतीत मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघात खासदार नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. पण नवनीत राणा यांच्या उमेदवारीला बच्चू कडू यांचा विरोध आहे. त्यामुळे बच्चू कडू येत्या 3 एप्रिलला अमरावतीत आपल्या उमेदवाराचा अर्ज भरणार आहेत. विशेष म्हणजे बच्चू कडू यांच्या बाजूने अर्ज भरणारा उमेदवार हा भाजपचा असेल, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अमरावतीत भाजप नेता VS भाजपचा उमेदवार अशी लढत तर होणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतोय. बच्चू कडू यांनी भाजप नेत्याचं नाव अद्याप सांगितलेलं नाही. पण भाजपचा अमरावतीमधील महत्त्वाचा नेते अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *