डोंबिवली : एका दांम्पत्याने पोटच्या पाच दिवसाच्या बाळाला एक लाखात एका डॉक्टरला विकल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीसारख्या सुशिक्षित नगरीत घडला आहे.  दोन दिवसानंतर त्या आईने बाळ परत मागितल्यानंतर त्या डॉक्टरने देण्यास नकार दिल्याने हा प्रकार उजेडात आला. ठाणे महिला व बालविकास विभाग आणि सामाजिक कार्यकत्यांच्या मदतीने बाळाला त्या दांम्पत्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मात्र कल्याणात डॉक्टर बेकायदेशीर बालक आश्रम चालवित असल्याचे उजेडात आले असून तेथून  ७१ बालकांची सुटका करण्यात आली आहे.  त्या बालकांना शासकीय बालगृहात ठेवण्यात आले आहे. ठाणे जिल्हा महिला व बालविकास  विभागाने ही धडक कारवाई केली आहे.  या दोन्ही कारवाई ठाणे महिला व बाल विकास विभाग बालसंरक्षण जिल्हा अधिकारी रामकृष्ण रेड्डी, बालसंरक्षण अधिकारी अॅड पल्लवी जाधव यांनी केलीय. 

असा घडला प्रकार …..

डोंबिवलीत राहणा-या एका दांम्पत्याने कल्याण येथील डॉ केतन सोनी यांना आपले ५ दिवसांचे बाळ १ लाख रूपये किंमतीला विकले. हे दांम्पत्य एक वर्षापासून सोनी यांच्या संपर्कात होते. त्यांचा मोठा मुलगा आठ वर्षाचा असून तो डॉ केतन सोनी यांच्या नंददीप संस्थेत एक वर्षापासून राहत होता. सदर महिला चार महिन्याची गर्भवती असताना तिने डॉ सोनी यांना गर्भपात करण्याकरीता विचारणा केली, त्यावेळी डॉ सोनी यांनी गर्भपात का करता ? त्या पेक्षा ज्या दांम्पत्यांना बाळ होत नाही अशा लोकांना तुम्ही ते बाळ देऊ शकता याचा तुम्हाला मोबदला मिळेल याकरीता डॉ सोनी यांनी त्यांचे वारंवार समुपदेशन केले. अखेर दांम्पत्याने बाळ होऊ देण्याचा विचार केला. १० नोव्हेंबर २०२१ रोजी त्या महिलेची शास्त्रीनगर येथे प्रसुती झाली, तिने मुलाला जन्म दिला. डॉक्टरने त्याचवेळी दांम्पत्याला संपर्क साधून बाळाची मागणी केली. ठरल्याप्रमाणे १५ नोव्हेंबर २०२१ रोजी डॉक्टराने त्या दांम्पत्याकडून १ लाख रूपये देऊन त्यांचकडील पेपरवर सही घेऊन बाळाचा ताबा घेतला. दोन दिवसानंतर आईने बाळ परत हवे त्यासाठी डॉक्टरांना फोन करून विनवणी केली. तुमचे पैसे मला नको, मला बाळ हवे आहे. मात्र आता बाळाला विसर बाळावर तुझा काहीही अधिकार नाही असे उत्तर डॉक्टरने दिले. त्या महिलेने घडलेला प्रकार डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चव्हाण यांना सांगितला. महिला व बाल विकास   बालसंरक्षण जिल्हा अधिकारी रामकृष्ण रेड्डी, बालसंरक्षण अधिकारी अॅड पल्लवी जाधव, सिध्दी तेलंगे सखी वन स्टॉप सेंटर, श्रध्दा नारकर ठाणे चाईल्ड लाईन यांनी सदर महिलेकडून सर्व गोष्टी समजावून घेतत्यानंतर पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार सांगितला. अखेर बाळाचा ताबा घेण्यात यश आलं. या तिन्ही आरोपींविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कल्याणातून ७१ बालकांची सुटका ….

डॉ केतन सोनी हे कल्याणात बालकाश्रम चालवीत असल्याची माहितीही त्यांना मिळाल्यांनतर बालसंरक्षण अधिका-यांच्या टीमने  संस्थेत धाव घेतली. पाहणी  केल्यानंतर २९ मुले हजर असल्याचे त्यांना दिसून आले. संस्थेची तपासणी करीत असतानाच लहान मोठया मुलींचे कपडे त्यांच्या निदर्शनास आले. अधिका-यांनी संस्थेच्या कर्मचा-यांना विचारल्यानंतर त्यांनी मुली संस्थेत राहत नाहीत असे उत्तर दिले. बालकल्याण समितीने बाजारपेठ पोलीस ठाणे गाठून २३ मुली बेपत्ता असल्याची माहिती कळवली. त्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्यातील अधिकारी संस्थेत दाखल झाले. संस्थेच्या खोल्यांची तपासणी केल्यानंतर आणि सीसीटिव्ही फुटेज पाहण्यात आले. त्यावेळी २३ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री साडेअकराच्या दरम्यान काही मुले व मुलींना संस्थेतून बाहेर घेऊन जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर संस्थेच्या कर्मचा-यांची सखेाल चौकशी केल्यानंतर संस्थेच्या बिल्डींगपासून काही अंतररावर एका जुन्या इमारतीत मुले असल्याची कबुली देण्यात आली.  ठाणे बालसंरक्षण अधिका-यांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केल्यानंतर ३८ मुले मुली हे वय वर्षे २ ते १३ वयोगटातील बालके एका खोलीत कोंडून ठेवल्याचे आढळून आले. त्या मुलांना ताब्यात घेऊन बाल कल्याण समिती समोर आणण्यात आले. आजूबाजूच्या ठिकाणांहून ६ मुले संस्थेत आणण्यात आले व एकूण ७१ बालके ही संस्थेत एकत्रीत करण्यात आली. संस्थेच्या तपासणीत उपस्थित ७१ बालकांच्या कोणत्याही फाईल्स रजिस्टर बालकांशी संबधित कोणतेच कागदपत्र आढळून आलेले नाहीत या बालकांना शासकीय बालगृहात ठेवण्यात आले आहे त्यांच्या पालकांची योग्य ती शहानिशा करून बालकांना पालकांच्या  ताब्यात दिले जाणार आहे असे एका अधिका-याने सिटीझन जर्नलिस्टशी बोलताना सांगितले. तसेच संस्थेत उपलब्ध असलेले दस्तऐवज मुलांची माहिती मिळवण्यासाठी बाल कल्याण समितीने ताब्यात घेतले आहेत. 
़़़़़़

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!