अयोध्दा :अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी फुलांची आकर्षक सजावट,रोषणाईने अयोध्दा सजली होती जणूकाय अयोध्देत दिवाळी साजरी झाली.
गणेशपूजनाने या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली.त्यानंतर १२ वाजून २९ मिनिटांनी हा प्राण प्रतिष्ठा विधी संपन्न झाला. ८४ सेकंदाच्या मुहूर्तावर हा विधी संपन्न झाला. प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यानंतर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अयोध्येतील राम मंदिरावर पुष्पवर्षाव करण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल हे देखील गर्भगृहात उपस्थित होते.
रामलल्ला दिव्य मंदिरात राहणार : मोदी
यावेळी संबोधित करताना मोदी म्हणाले, आमचे रामलल्ला आता तंबूत राहणार नाही. आमचे रामलल्ला आता दिव्य मंदिरात राहणार आहेत. राम मंदिराच्या उभारणीनंतर देशवासीयांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे. आज आपल्याला शतकानुशतकांचा वारसा मिळाला आहे, श्री रामाचे मंदिर मिळाले आहे. गुलामगिरीची मानसिकता मोडून उठणारे राष्ट्र नवा इतिहास घडवते. आजपासून हजार वर्षांनंतरही लोक या क्षणाबद्दल आणि तारखेबद्दल बोलतील. रामाचा किती आशीर्वाद आहे की आपण सर्वजण हा क्षण होताना पाहत आहोत.
राम अग्नी नाही, ऊर्जा आहे. राम वाद नाही, राम उपाय आहे. राम फक्त आपले नाही तर सर्वांचे आहेत. राम वर्तमान नसून शाश्वत आहे. हे मंदिर केवळ देवाचे मंदिर नाही तर भारताचे दर्शन देणारे मंदिर आहे. राम ही भारताची विचारधारा आहे असेही मोदी म्हणाले.
श्री रामाचे भव्य मंदिर तर झाले आता पुढे काय असा सलाव उपस्थित करत एक संकल्प मांडला. राम मंदिराच्या निर्मितीच्या पुढे जाऊन आपण एक समर्थ, भव्य आणि दिव्य भारत निर्मितीची शपथ घेऊया, असे आवाहन मोदींनी केले.