रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी रिक्षाचालकांची पालिकेवर धडक;
कल्याण ( प्रवीण आंब्रे ) : गणेशोत्सवात रस्त्यांवरील खड्डे बुजविल्यानंतर देखील कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डे काही दिवसातच ‘जैसे थे’ स्थिती आल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ लागलीय. पालिका प्रशासनाने निर्देश देऊनही हे खड्डे का बुजविले जात नाही? त्यासाठी चालढकल होत असल्याने संतप्त रिक्षा चालकांनी सोमवारी महापालिका मुख्यालयात धडक दिली. त्वरित खड्डे बुजविले नाही तर दिपावली पूजनाच्या दिवशीच रिक्षा बंद आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी महापालिका प्रशासनाला दिला. दुसरीकडे संभाजी ब्रिगेडने महापालिका क्षेत्रातील खड्डे प्रशासनाला मोजून दाखविण्याचे अभिनव आंदोलन करण्याचे सुतोवाच केले.
गेल्या काही दिवसांपासून महापालिका हद्दीतील वेगवेगळ्या मार्गावर तसेच महत्वाच्या चौकांमध्ये वाहतूक कोंडी होण्याच्या घटना वाढल्या आहे. वाहतूक कोंडीमुळे तासंतास वाहतूक खोळंबून प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ होणे, नाहक इंधन जळणे, वेळ वाया जाणे असे प्रकार घडत आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यांवरील खड्ड्यांनी देखील वाहतूक कोंडीला कारण ठरत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांनी विशेषतः रिक्षा-दुचाकीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पाठदुखी सारख्या आजार बळावत आहेत. आज सकाळी देखील रस्त्यावरील खड्डय़ामुळे कल्याण पश्चिमेत प्रचंड वाहतूक कोंडी झाली. वालधूनी रेल्वे उड्डाणपूलावरील खड्डे देखील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत. तेथील पूलाचे गर्डर उघडे पडले आहे. विशेषतः रिक्षा चालकांना त्याचा जास्त त्रास होत आहे. एका फेरीसाठी त्यांना दोन ते तीन तास लागत आहेत. त्यामुळे संतापलेल्या रिक्षा चालकांनी आज महापालिका मुख्यालयात धडक दिली. ठाणे रिजन रिक्षा चालक मालक महासंघाचे कोकण विभागीय अध्यक्ष प्रकाश पेणकर यांच्यासह रिक्षा चालकांनी महापालिकेचे शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांची भेट घेत रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजविले नाही तर दिपावली पूजनाच्या दिवशीच रिक्षा बंद करण्याचा इशारा दिला.
संभाजी ब्रिगेडचा ‘खड्डे मोजणी’ आंदोलनाचा इशारा
संभाजी ब्रिगेडचे कल्याण पश्चिमचे अध्यक्ष अमित केरकर यांनी देखील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनांना अपघात होऊन जायबंदी वा मृत्यूमुखी पडण्याची शक्यता असूनही अशा गंभीर बाबीकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत प्रशासनाला हे खड्डे दिसत नाहीत असा सवाल केला आहे. दरवर्षी रस्त्यांवर खड्डे पडण्याचे प्रमाण प्रचंड असते. खड्डे बुजवण्याचे काम पावसाळ्यापुर्वी करण्याऐवजी गणेशोत्सवाचे कारण पुढे करीत ऐन पावसाळ्यात केले जाते आणि पावसाळ्यात केलेली रस्त्यांची कामे साहजिकपणे पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जातात. अशाप्रकारे एकच रस्ता वारंवार बनविणे वा खड्डे वारंवार बुजविण्याचे काम केले जात असल्याचे केरकर यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यंदाही गणेशोत्सवाच्या तीन दिवस आधी पालिका क्षेत्रातील खड्डे भरण्याचे काम निकृष्ट पध्दतीने करण्यात आले. त्याच्या बातम्याही प्रसारीत झाल्या आहेत. परिणामी दहा दिवसांचे गणपतींचे विसर्जन होताच बुजवलेल्या खड्ड्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे या निवेदनात पुढे म्हटले आहे. शहरातील खड्डे लवकर बुजविण्यात यावेत यासाठी दि. १३ ऑक्टोबर रोजी प्रातिनिधीक स्वरुपात कल्याण शहरातील रस्त्यावरील खड्डे मोजून संबंधित कार्यकारी अभियंत्यांना शहरातील खड्डयांची संख्या सांगण्याचे आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
…तर खड्डे भरले जातील प्रशासनाचे म्हणणे
शहर अभियंता कुलकर्णी यांनी परतीचा पाऊस लांबल्याने खड्डे भरता आलेला नाही. तसेच पावसात खड्डे भरण्याचे काम करु नये, असे आदेश आयुक्त पी. वेलरासू यांनी दिलेले आहेत. तरी देखील वालधूनी रेल्वे उड्डाणपूलावरील खड्डे आज रात्रीत पाऊस नसल्यास भरले जातील. त्याचबरोबर उद्या पावसाने उघडीप दिल्यास रामबाग परीसरातील खड्डे भरण्याचे, असे आश्वासन रिक्षा चालकांना दिले आहे.
खड्डे मोजताना संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते