डोंबिवली : डोंबिवलीतील ज्येष्ठ पत्रकार श्रीराम कांदू यांच्यावर गुरूवारी दोन अनोळखी इसमांनी जीवेघेणा हल्ला केल्याची घटना गुरूवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. हल्लेखोरांनी त्यांच्या दुकानातील सामानांची नासधूस केली. याप्रकरणी पत्रकार कांदू यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या भ्याड हल्ल्याचा पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
डोंबिवलीत पूर्वेकडील संत नामदेव पथावर आरती स्वीट मार्ट या त्यांच्या मिठाईच्या दुकानात पत्रकार कांदू हे एकटेच असतानाच दुपारी साडेतीनच्या सुमारास एक महिला त्यांच्या दुकानात आली. तिने काही वस्तू खरेदी केल्या. त्यानंतर ही महिला दुकानातून निघून गेल्यानंतर दोन अनोळखी तरुण दुकानात घुसले. या दोघांनी पत्रकार कांदू यांना गलीच्छ शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर हल्लेखोरांनी काऊंटरवरील मिठाई व अन्य खादयपदार्थ इतरत्र फेकून नासधूस केली. त्यानंतर हल्लेखोरांनी रिक्षातून पलायन केले. या प्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात अनोळखी महिला व तिच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून सीसीटिव्हीची तपासणी सुरू …
पोलिसांनी आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजच्या माध्यमातून पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. कांदू यांचे स्वत:चे कार्यालय असून, सोल्यूशन कन्सल्टन्सी सुरू केली आहे. त्याच्या माध्यमातून अनेक त्रस्त व अन्यायग्रस्त नागरिक मार्गदर्शन आणि सल्ला घेण्यासाठी येत असतात. त्यातील काहीजण दुखावले असण्याची शक्यता असून त्यातूनच सूडबुद्धीने कुणीतरी आपल्यावर हल्ला केल्याचा संशय पत्रकार कांदू यांनी व्यक्त केला आहे.
[…] ज्येष्ठ पत्रकार श्रीराम कांदू यांच्य… […]