ठाणे (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात जितेंद्र आव्हाड सुखरुप बचावले आहेत. या हल्ल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांची गाडी एका सिग्नलवर थांबली असताना हल्ला करणाऱ्या तरुणांनी संधी साधली आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत हल्ला केला.
माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्या संघटनेकडून विशाळगाडवर आंदोलनही करण्यात आलं होतं. या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजेंवर टीका केली होती. ही टीका संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांच्या जिव्हारी लागली होती. संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेकडून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाड आज ठाण्याच्या दिशेला जात असताना तीन जणांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडीओत स्वराज्य संघटनेचा एक कार्यकर्ता आपण या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असल्याचं म्हणताना दिसतोय. “युवराज छत्रपतीराजे यांचं रक्त तपासावं लागेल की ते छत्रपती घराण्यातील आहे का, अशा प्रकारचं छत्रपतींच्या घराण्याशी बेताल वक्तव्य केलं, जितेंद्र आव्हाड तू मर्द असतास तर पळाला नसतास, तू पळालास, ही सर्वात मोठी बात महाराष्ट्राला समजली आहे की, तू पळपुटा आहेस. स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे”,
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर मुंबईत झालेल्या हल्ल्यानंतर ठाण्यात त्याचे पडसाद उमटले. आव्हाड आपल्या निवासस्थानी दाखल होताच संतप्त कार्यकर्त्यानी ठाण्यातील पूर्व दृतगती महामार्गासह मुंब्र्यातील अमृतनगर येथे रास्ता रोको केला. तसेच या हल्ल्याचा निषेध देखील करण्यात आला. यावेळी आव्हाड समर्थकांनी राज्य सरकार आणि भाजपविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.