महापालिका आयुक्तांसह डीसीपी, एसीपींवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होणार
उल्हासनगर : दलित समाजाबद्दल आक्षेपाई जातीयवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यासह पोलीस उपायुक्त अंकित गोयल, एसीपी विकास तोटावार आणि पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांच्यावरही अॅट्रोसिटीतंर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश कल्याण सत्र न्यायालयाने दिले आहेत.
जुलै महिन्यात पालिकेतील गटनेत्यांच्या केबिन वाटपावरून आयुक्त आणि रिपाई नगरसेवकांची वादावादी झाली होती. यावेळी आयुक्तांनी दलित समाजाला उद्देशून आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यावेळी रिपाइं नगरसेवक भगवान भालेराव यांनी आयुक्तांवर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली हेाती. मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ दर्शविली होती. त्यामुळे नगरसेवक भालेराव यांनी कल्याण सत्र न्यायालयात धाव घेतली होती. अखेर आज याप्रकरणी महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यासह गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणारे पोलीस उपायुक्त अंकित गोयल, एसीपी विकास तोटावार आणि पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांच्याविरोधात ऍट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले. त्यामुळं आयुक्त आणि पोलीस अडचणीत सापडलेत.