मुंबई : अयोध्येमध्ये 22 जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनानंतर देशातील सामान्य जनतेला श्री रामाचं दर्शन घेता यावं यासाठी भारतीय रेल्वे ‘आस्था’ ही विशेष ट्रेन चालवणार आहे. या रेल्वे गाड्या देशभरातील 66 वेगवेगळ्या ठिकाणांना अयोध्येशी जोडल्या जाणार आहेत. राम मंदिराला भेट देण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रत्येक ट्रेनमध्ये 22 डबे असतील. भाविकांच्या मागणीनुसार गाड्यांची संख्या नंतर वाढवली जाणार आहे. नवी दिल्ली, जुनी दिल्ली, निजामुद्दीन आणि आनंद विहार येथून विशेष आस्था गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्ली व्यतिरिक्त आगरतळा, तिनसुकिया, बारमेर, कटरा, जम्मू, नाशिक, डेहराडून, भद्रक, खुर्द रोड, कोट्टायम, सिकंदराबाद, हैदराबाद आणि काझीपेठ येथूनही गाड्या धावतील.
सुरक्षेच्या कारणास्तव, रेल्वेने आपल्या पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम (PRS) मध्ये ट्रेनच्या तपशीलांचा उल्लेख न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र विशेष आस्था गाड्यांची राउंड-ट्रिप तिकिटे IRCTC वेबसाइट आणि अॅपवर बुक केली जाऊ शकतात.
तामिळनाडूमध्ये चेन्नई, सेलम आणि मदुराईसह नऊ स्थानकांवरून आस्था स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. या गाड्या महाराष्ट्रातील नागपूर, पुणे, मुंबई, वर्धा, जालना आणि नाशिक अशा एकूण सात स्थानकांवरून अयोध्येपर्यंत धावतील. सुमारे 200 विशेष गाड्या चालवण्याची भारतीय रेल्वेची योजना आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानंतर 100 दिवस वेगवेगळ्या शहरांतून या गाड्या धावणार आहेत.
महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या गाड्या
मुंबई-अयोध्या-मुंबई
नागपूर-अयोध्या-नागपूर
पुणे-अयोध्या-पुणे
वर्धा-अयोध्या-वर्धा
जालना-अयोध्या-जालना