कल्याण: श्री संत सावळाराम महाराज यांनी वैराग्यशील राहून वारकरी संप्रदयाचे माध्यमातून समाजामध्ये वैचारिक क्रांती केली. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात दूरदृष्टी ठेऊन उल्लेखनीय कार्य केले. महाराजांवर वारकरी संतसाहित्याचा विशेष प्रभाव होता. ठाणे, रायगड जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या भावना विचारात घेऊन संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचे यथोचित स्मारक तथा अध्यात्मपिठ डोंबिवलीत उभारण्याची मागणी डोंबिवलीतील आगरी युथ फोरम संचलित श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे स्मारक समितीच्या वतीने आज कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना करण्यात आली. यावेळी बोलताना श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचे यथोचित सन्मान करणारे स्मारक उभारले जाईल, असे आश्वासन यावेळी डॉ. शिंदे यांनी दिले.

वारकरी संताचे विचार हे सर्वसमावेशक आहेत. ज्या विचारांनी प्रेरीत होऊन महाराजांनी समाजात धवल क्रांती केली ते संतांचे सात्विक विचार, संत साहित्य आज ही समाजाला सुसंकृत, सुदृढ बनवण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. हे संताचे विचार नव्यापिढीमध्ये समाजाच्या तळागाळापर्यंत रुजवण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. याच हेतून श्रीसंत सावळाराम महाराजांचे स्मारक तथा अध्यात्मपिठ उभारण्याचा आगरी युथ फोरम संचलित श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे स्मारक समितीचा आहे. या अध्यात्मपिठाच्या माध्यमातून संत साहित्याच्या अभ्यासासाठी वारकरी शिक्षण संस्था सुरु करुन अध्यात्मिक शिक्षणाबरोबरच शालेय शिक्षण आणि त्यांच्यातील उपजत कलागुणांचा विकास घडवून आणण्याचा स्मारक समितीचा हेतू आहे. या अध्यात्मपिठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायिक अध्यात्मिक शिक्षण, संस्कृत पाठशाळा, किर्तनकुल संगीत शिक्षण, योगविद्या प्रशिक्षण याबरोबरच अनेकविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवण्याचा हेतू आहे. ही सर्व व्यवस्था गुरुकुल पद्धतीने विद्यार्थ्याच्या निवास व्यवस्थेसह करण्यासाठी मोठ्या भूखंडाची आणि निधीची आवश्यकता समितीला भासणार आहे. याबाबतची माहिती यावेळी समितीच्या वतीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना दिली. श्री संत सावळाराम महाराजांचे त्यांच्या जन्म आणि कर्मभूमीत स्मारक आणि अध्यात्मपिठ उभारण्याचे समाजमनातील स्वप्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या लोकाभिमुख कार्यशैलीमुळे पूर्ण होण्याचा विश्वास समितीला आहे. त्यामुळे आपण आम्हाला सहकार्य करावे अशी इच्छा यावेळी समितीच्या सदस्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदें यांच्यासमोर मांडली. यावेळी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी श्री संत सावळाराम महाराज यांचे भव्य स्मारक आणि अध्यात्मपीठ उभारले जाईल असे आश्वासन दिले. त्यासाठी लवकरच जागेचा शोध घेतला जाईल आणि त्यासाठी लागणारा निधी उभारला जाईल असेही डॉ. शिंदे यावेळी म्हणाले. कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या दिवा बेतवडे गावात आगरी, कोळी आणि वारकरी भवनाच्या उभारणीसाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून यापूर्वीच १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यावेळी ह.भ.प. चेतन महाराज, अध्यक्ष वारकरी संप्रदाय, उपाध्यक्ष ह.भ.प. बाळकृष्ण महाराज, ह.भ.प. अनंता महाराज(हेदुटणे), ह.भ.प. गणेश महाराज ठाकूर (सोनारपाडा) खजिनदार, ह.भ.प. अर्दन महाराज इताडे (भिवंडी), गुलाबराव वझे समिती अध्यक्ष, शरद पाटील समिती सरचिटणीस, . पी.जी. म्हात्रे समिती खजिनदार, संतोष काळण, ह.भ.प. विनीत महाराज (सोनारपाडा) ह.भ.प. गुणाजी मढवी (भोपर), ह.भ.प. विश्वनाथ महाराज (हेदुटणे), ह.भ.प. प्रकाश महाराज म्हात्रे (सोनारपाडा), राजीव तायशेटे (आर्कीटेक), ह.भ.प. जे.डी. म्हात्रे, सुखदेव पाटील, ह.भ.प. ओमकार अनंत भोईर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *