डोंबिवली : अयोध्देत श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा देशभरात उत्साहात साजरा होत असतानाच, दुसरीकडे गेल्या १५ दिवसांपासून डोंबिवलीचे वातावरण राममय झालं आहे. अयोध्देतील श्रीराम मंदिराची सुबक प्रतिकृती साकारून डोंबिवलीकरांना दर्शन घडवणारे कलादिग्दर्शक उदय इंदप हे त्यानिमित्ताने महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर एक सांस्कृतीक परिवाराच्या माध्यमातून हि संकल्पना साकारण्यात आली हेाती.
डोंबिवलीकर असणारे कलादिग्दर्शक उदय इंदप हे गेल्या ३० ते ३५ वर्षापासून कलेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांनी मोठ मोठे राजवाडे, राजमहल, गड किल्ले असे अनेक अप्रतिम देखावे उभारले आहेत. लग्नाचे सेट असो, वा सिनेमाचे सेट मोठ, मोठे देखावे त्यांनी उभारले आहेत. मात्र ते नेहमीच प्रसिध्दीपासून लांबच राहिले. डोंबिवलीत अयोध्देतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारल्यानंतर इंदप हे प्रसिध्दीच्या झोतात आले आहेत. देशभरात त्यांचे कौतूक होत आहे. विशेष म्हणजे कोणत्याही संस्थेतून त्यांनी कलेविषयीचं प्रशिक्षण घेतलेलं नाही. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी हर्षद मेहता यांनी लुटलेल्या पैशाचा देखावा उभारला होता. त्या दिवसापासून ते या क्षेत्राकडे वळल्याचे इंदप सांगतात.
कलाक्षेत्रात सानिकाची भरारी ..
उदय इंदप त्यांची कन्या सानिका या बापलेकीने हे अप्रतिम श्रीराम मंदिराचा देखावा साकारला आहे. विशेष म्हणजे राम मंदिराचे डिझाईन सानिका हिने केले आहे. सानिका ही कमर्शियल आर्टीस्ट, व्हीएफएक्स आर्टीस्ट आहे. मागील काही महिने मेहनत घेऊन बापलेकीने राम मंदिराची उभारणी केली आहे. वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवीत सानिका कला क्षेत्रात नवी भरारी घेत आहे.
कलेतून समाजसेवेचा आदर्श …
शेतक- यांची आत्महत्या असो, चला शाळेत जाऊया अथवा नैसर्गिक आपत्ती असो, वा नेत्रदान .. असे समाजात प्रबोधन करणारे देखावे आता ते उभारीत आहेत. यासाठी ते स्वत:चे पैसेही खर्च करतात. उदय इंदप यांचे वडील अरविंद इंदप हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते तसेच शिवसेनेचे तालुका प्रमुख होते. लहानपणापासूनच वडीलांच्या समाजसेवेची तळमळ त्यांनी पाहिली आहे त्यामुळे वडीलांच्या समाजसेवेची परंपरा कलेच्या माध्यमातून जपलीय असे उदय सांगतात.
महाराष्ट्र भूषण हेच स्वप्न …
कलादिग्दर्शक उदय इंदप यांच्या कलेची दखल अनेक सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी घेतली आहे. आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कार, मान सन्मान मिळाले आहेत. परंतु राज्य सरकारकडून कलेची कोणतीही दखल घेतली नसल्याची खंत ते व्यक्त करतात. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा हे त्यांचे स्वप्न असल्याचे ते सांगतात.