मुंबई : संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत. महात्मा गांधी यांचे खरे वडील मुस्लिम जमीनदार होते. मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते, असे तारे मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी तोडले आहेत. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही त्याचे संतप्त पडसाद उमटले. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या मुद्द्याकडे सभागृहाचं लक्ष वेधीत. यावेळी संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी संभाजी भिडेंचा बंदोबस्त करून आजच सभागृहात निवेदन करण्याची मागणी थोरात यांनी केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग्य ती कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले.

अमरावतीत संभाजी भिडे नावाच्या एका गृहस्थाने राष्ट्रपित्याबद्दल अत्यंत निंदापूर्वक, नालस्तीपूर्वक विधान केलं आहे. आपण त्याची माहिती घेतली असेल. अशा प्रकारची समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीला आयपीसी 153 किंवा जो काही कलम असेल त्यानुसार ताबडतोब अटक केली पाहिजे. समाजात दंगेधोपे आणि तणाव निर्माण करण्याचा या व्यक्तिचा जाणूनबुजून प्रयत्न असतो. हा पहिल्यांदाच केला नाही. यापूर्वीही त्यांनी असा प्रयत्न केला आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

बाळासाहेब थोरात म्हणाले, संभाजी भिडे ही विकृती आहे. त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अवमानकारक विधान केले आहे जे समग्र देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. संभाजी भिडे वारंवार असं बोलतो, त्याला पाठीशी नेमका कोण घालतो याचा शोध घेणे आवश्यक आहे. संभाजी भिडे यांचा हेतू महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा आहे हे ओळखले पाहिजे. कोणाच्या राजकीय फायद्यासाठी तो वारंवार अशी विधाने करतो? आम्ही सभागृहात संभाजी भिडेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारने आजच या विषयावर कारवाई करावी आणि सभागृहाला सूचित करावे. अन्यथा आम्ही शांत बसणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!