कल्याण : कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापुरात नवीन वर्षांचं स्वागत करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून नागरीकांना नववर्ष आगमन सुरक्षितपणे व निर्विघ्नपणे साजरा करता यावा, याकरीता कल्याण डोंबिवली परिसरात बाराशेहुन अधिक पोलीस रस्त्यावर तैनात असणार आहेत. त्यांचसोबत महत्वाच्या ठिकाणी एस. आर.पी.एफ. आरसीपी, होमगार्डस् असा चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलिंग तसेच फिक्स पॉईंट नेमण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वाहतूक नियमांचे उल्लंघन व ‘ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह’ विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच विविध आस्थापना व गुन्हेगारांची तपासणी मोहीम राबण्यात येणार असून शहरांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने पोलीस नजर ठेवणार आहे. त्याच बरोबर गुन्हेगारांवरती आळा घालण्यासाठी गरजेच्या ठिकाणी साध्या वेशात तैनात राहणार आहे तसेच मद्य पिऊन वाहन चालवणारे व्यक्ती, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारे व्यक्ती, महिलांची छेडछाड करणारे व्यक्ती, अनधिकृत मद्य विक्री करणाऱ्या आस्थापना, अंमलीपदार्थ विकी/सेवन यासारखी बेकायदेशीर कृत्य करणारे व्यक्ती यांचे विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी नियमांचे भान ठेवून नववर्ष आगमन उत्साहाने व जल्लोषात साजरे करावे, असे आवाहन कल्याण झोन-3 पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.