ठाणे दि.३: ग्रामपंचायतमध्ये कंत्राटी तत्वावर कार्यरत असणाऱ्या सात कर्मचाऱ्यांना सेवा जेष्ठतेनुसार जिल्हा परिषद सेवेतील वर्ग – ३ व वर्ग – ४ च्या पदावर १०% आरक्षणाच्या नियमानुसार समाविष्ट करण्यात आले. सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या देण्यात आल्या.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात समुपदेशनाद्वारे लगेचच नियुक्ती आदेशही जारी करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, आरोग्य व बांधकाम समिती सभापती वंदना भांडे, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे, समाज कल्याण समिती सभापती प्रकाश तेलीवरें, महिला व बाल कल्याण समिती सभापती श्रेया गायकर, आदी मान्यवरांच्या शुभहस्ते कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देऊन नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना चांगले काम करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जेष्ठता सुचिनुसार व शैक्षणिक पात्रतेनुसार एकूण 7 कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सेवा वर्ग 3 या संवर्गामध्ये 6 ग्रामसेवक व 1 वरि. सहा. लेखा या पदावर नियुक्ती देण्यात आल्याचे ग्रामपंचायतचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी सांगितले.