मुंबई, दि. १४: बालदिनाचे औचित्य साधून बालरंगभूमीसाठी कार्य करणाऱ्या ‘गंधार’ कला संस्थेतर्फे लहान मुलांच्या ‘कट्टी बट्टी’ या कार्यक्रमाचे तसेच ‘गंधार गौरव’ पुरस्कार सोहळ्याचे राजभवन येथे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाने राज्यपालही प्रभावीत झाले ‘कट्टी बट्टी’ या कार्यक्रमात लहान मुलांनी सादर केलेल्या बालभारती पुस्तकातील बडबडगीतांना राज्यपालांनी कौतुकाची थाप दिली व बालनाट्य चमूला वीस हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

राज्यपाल म्हणाले की लहान मुलांना संस्कार देण्याचे स्थायी कार्य कुटुंब, समाज व सांस्कृतिक संस्थांकडून होत असते. या संस्कारांच्या माध्यमातून समाज घडतो व समाजाच्या माध्यमातून राष्ट्र निर्माणाचे कार्य होते. संगीत, कला, नाट्य या गोष्टींचा ज्याला गंध नाही अश्या व्यक्तीला विना शेपटीचा पशु संबोधले जाते, या अर्थाच्या सुभाषिताचा उल्लेख करून संगीत व नाट्यात दुःख विसरायला लावण्याची ताकत आहे, असे राज्यपालांनी यावेळी बोलताना सांगितले.


बालप्रेक्षक हा महत्वाचा प्रेक्षक आहे व त्याचे पुढे सादर करणे आव्हानात्मक काम असते. करोनाचे निर्बंध संपल्यावर आपण पुन्हा बालनाट्य घेऊन रसिकांपुढे येऊ, असे अतुल परचुरे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. यावेळी आमदार आशिष शेलार, आमदार संजय केळकर, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की व गंधारचे अध्यक्ष मंदार टिल्लू व्यासपीठावर उपस्थित होते.

या कलाकारांचा गौरव
बालरंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अभिनेते अतुल परचुरे यांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते गंधार गौरव पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आला, तर ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर दिग्दर्शक जयंत पवार, निवेदिका अनुश्री फडणीस, संगीतकार ओंकार घैसास व प्रकाश पारखी यांना गंधार युवा गौरव पुरस्कार देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!