ठाणे, दि. 30 : – राज्य शासनाच्यावतीने आयोजित उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ पुरस्कार स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना पुरस्कारासाठी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून गणेशोत्सव मंडळांनी दि. 02 सप्टेंबर 2022 पूर्वी mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर ऑनलाइन अर्ज पाठवावेत, असे आवाहन राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने केले आहे.
राज्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांसाठी पुरस्कार देण्याचे राज्यशासनाने जाहीर केले आहे. यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने कार्यपद्धती ठरविली आहे. यानुसार, उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीस स्टेशन यांची किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल.
अर्ज इथे मिळेल
यासंबंधीचा अर्जाचा नमुना राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे www.pldeshandekalaacademy.org हे संकेतस्थळ आणि दर्शनिका विभागाच्या https://mahagazetteers.com संकेतस्थळावरही उपलब्ध करुन देण्यात आले आहे. अर्ज व सहभागासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळाने अर्ज भरुन mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर दि. 02 सप्टेंबर 2022 पूर्वी ऑनलाइन पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
असे आहेत पुरस्कार
राज्यातील पहिल्या तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळाचा शासनाकडून पुढीलप्रमाणे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येईल. प्रथम क्रमांकास पाच लाख रु., द्वितीय क्रमांकास रु.2.50 लाख व तृतीय क्रमांकास एक लाख रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच राज्य समितीकडे 36 जिल्ह्यातील 1 प्रमाणे 36 प्राप्त शिफारशीतील गणेशोत्सव मंडळापैकी 3 विजेते मंडळांना वगळून उर्वरित 33 गणेशोत्सव मंडळाचाही राज्य शासनाकडून 25 हजार रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.