कल्याण (प्रतिनिधी) : एकिकडे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ओपन लॅन्ड टॅक्सपोटी बिल्डर, व्यावसायिक व कंपन्यांकडे ५३० कोटी रूपये थकीत असतानाच दुसरीकडे गरीब नागरिकांच्या माथी घनकचरा उपविधी कराच्या माध्यमातून दरवर्षी ६०० रूपयांचा भुर्दडं मारला जात आहे. याला शिवसेनेचे स्थानिक नेते व माजी स्थायी समितीचे सभापती वामन सखाराम म्हात्रे यांनी विरेाध दर्शविला आहे. ५३० कोटीची थकबाकी वसूल होईपर्यंत वाढीव कर भरू नका असे आवाहन म्हात्रे यांनी केले आहे. म्हात्रे यांच्या आवाहनला सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ओपन लॅन्ड टॅक्सपोटी बिल्डर, व्यावसायिक व कंपन्यांकडे थकीत असलेल्या ५३० कोटी रुपयांच्या वसुलीकरीता म्हा़े हे पाच वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री, राज्याचे पोलिस महासंचालक यांच्यासह महापालिकेच्या आयुक्तांकडे प्रतिज्ञापत्रावर तक्रारी केल्या आहेत. सदरची रक्कम वसुल व्हावी यासाठी लोकआयुक्तांच्या आदेशानुसार आर्थिक गुन्हे शाखा (ठाणे) यांच्यामार्फत चौकशी देखील सुरु आहे. ही रक्कम जोपर्यंत वसुल होत नाही तोपर्यंत नागरीकांनी घनकचऱ्याच्या वाढीव मालमत्ता करासह इतर कुठलेही वाढीव कर भरु नयेत, उर्वरित जो टॅक्स आहे तेवढाच भरावा, असे आवाहन म्हात्रे यांनी केले आहे. महापालिकेमध्ये धनदांडग्या बिल्डर-विकासक यांना वेगळे नियम-कायदे आणि गोरगरीब मध्यमवर्गीय लोकांसाठी वेगळे नियम-कायदे हा अन्याय असल्याची भावना म्हात्रे यांनी व्यकत केली आहे. तसेच गेल्या २०११ पासून २०२० पर्यंत २६ हजार कोटी रुपये विकास कामांवरती भांडवली खर्च केलेला आहे. त्या सर्व कामांचा वार्षिक प्रशासकीय अहवाल प्रसिध्द करावा व नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी वामन म्हात्रे यांनी केली आहे.
पालिकेचे हजारो कोटीचे उत्पन्न बुडीत
महापालिका क्षेत्रातील बिल्डर, व्यावसायिक व कंपन्यांकडील ओपन लॅन्ड टॅक्सच्या थकबाकीचे ५३० कोटी आणि ज्या मालमत्तांना अजून कर आकारणी झालेली नाही असे १ हजार कोटीहून अधिक उत्पन्न महापालिकेचे बुडत आहे. ते वसुल करण्याऐवजी प्रशासनाने करवाढीचा सोपा मार्ग निवडलेला आहे. सदरची करवाढ करताना प्रशासनातील अधिका-यांकडून महापालिका आयुक्तांची दिशाभूल केली जात आहे याकडेही म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.
वाढीव कराचा निर्णय रद्द करा
गेल्या २ वर्षात कोरोना काळात अनेकांच्या नोक-या गेल्या आहेत तर अनेकांना रेाजगार गमावावे लगात आहेत तर अनेकांच्या घरात दु:खद घटना घडल्या आहेत. नागरिकांना आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. कोरोना महामारीमुळे गोरगरीब जनतेला उपाशी मरण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे घनकचऱ्याच्या वाढीव कर आकारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने मागे घ्यावा अशी विनंतीही वामन म्हात्रे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.