ठाणे दि.10 : जिल्ह्यातील कृषी विकासाला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य पुरस्कृत कृषी योजनांची अंमलबजावणी क्षेत्रीय स्तरावर यशस्वीरित्या करावी. जेणे करुन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी मदत मिळेल. जिल्ह्यात सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज येथे केले.

कृषी विभागाच्या विविध योजनांसाठीच्या जिल्हा अभियान समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ.रविंद्र मर्दाने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक योजनेच्या प्रचार प्रसिध्दीसाठी कृषी विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला आज जिल्हाधिकारी श्री.नार्वेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये योजने विषयी माहितीचा प्रसार केला जाणार आहे. सध्या या योजनेंतर्गत चिकू, केळी, काजू आणि आंबा या फळपिकांचा समावेश असून चिकूसाठी अंबरनाथ आणि शहापूर हे तालुके अधिसूचित करण्यात आले आहेत. केळीसाठी कल्याण, भिवंडी, अंबरनाथ हे तालुके अधिसूचित असून काजूसाठी अंबरनाथ, मुरबाड, शहापूर तर आंबा पिकासाठी भिवंडी, मुरबाड, कल्याण, ठाणे हे तालुके अधिसूचित करण्यात आले आहेत.

आज झालेल्या बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.माने यांनी सुक्ष्म अन्न प्रकिया करीता अर्थ सहाय्य असलेल्या योजने बाबत सादरीकरण केले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते या योजनेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या योजनेंतर्गत समाविष्ट जिल्ह्यांमध्ये एक जिल्हा एक उत्पादन या नुसार कोकण विभागात रायगड जिल्ह्यात सागरी उत्पादने, ठाणे जिल्ह्यात पौष्टीक तृणधान्य आधारीत उत्पादने(नाचणी, भगर) तर पालघर- चिकू आणि रत्नागिरी- आंबा यांचा समावेश आहे.

यावेळी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, गट शेती, कृषी यांत्रिकीकरण, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री फसल बिमा योजना, पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना, रोहयो, पाणलोट क्षेत्र, विकेल ते पिकेल या योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *