मुंबई : जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आला. त्यामुळे या लाठीहल्ल्यात अनेक आंदोलक जखमी झाले. तसेच काही पोलीसही जखमी झाले. त्यानंतर विरोधकांकडून शिंदे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्यावतीनं माफी मागत दोषींवर कारवाई करणार असल्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासाठी बैठक झाली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद झाली.
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीला खासदार उदयनराजे भोसले होते. तसेच माजी खासदार संभाजीराजे देखील फोनवर होते. यावेळी राज्यातील परिस्थितीवर चर्चा झाली. मागण्यांच्या संदर्भात ही चर्चा झाली’. ‘जालन्यात जे काही झालं ते दुर्दैवी होतं. त्याचं समर्थन होऊ शकत नाही. मी मुख्यमंत्री असताना अनेक आंदोलने झाली, पण बळाचा वापर झाला नाही. या लाठीहल्ला प्रकरणात ज्यांना त्रास झाला, त्यांची माफी मागतो. दोषींवर कारवाई होणार, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ‘या प्रकरणाचं राजकारण योग्य नाही. काही पक्ष तसेच करत आहेत. लाठीचार्ज करण्यासाठी आदेश एसपी, डीएसपी यांच्या स्तरावर होतो. मावळ येथे काही झालं, त्याला तेव्हाचे मुख्यमंत्री जबाबदार होते का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
‘लोकांना यातील राजकारण दिसतं. मराठा आरक्षण २०१८ साली आलं. उच्च न्यायालयाने मान्य देखील केलं. आमचं सरकार असताना देखील सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी आणली नव्हती. मात्र सरकार बदलल्या नंतर हे झालं. उद्धव ठाकरे म्हणतात वटहुकूम काढा, मग त्यांनी का केलं नाही. आमच्या काळात ओबीसीप्रमाणे सगळ्या सुविधा मराठा समाजाला मिळाल्या, असे ते म्हणाले. ‘अनेक योजना सुरू केल्या. विद्यार्थ्यांना रहिवाशी भत्ता सुरू केला, यूपीएससी आणि एमपीएससी च्या शिक्षणासाठी सोय केली. परदेशी शिष्यवृती योजना सुरू केली. सर्व निर्णय महायुतीच्या काळातच झाले. आम्ही मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवण्याचं काम केलं. आज पुळका आल्यासारखे वागत आहेत, त्यांनी घालवण्याचं काम केलं, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी फडणवीस यांनी मावळमधील शेतकरी आंदोलनात झालेल्या गोळीबाराचा उल्लेख केला. विशेष म्हणजे त्यावेळी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार होते. मात्र आता अजित पवार हे फडणवीसांसोबत सत्तेत असल्यानं त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचा उल्लेख केला असला तरी यानिमित्तानं अजित पवारांना टोला लगावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.