डम्पिंग ग्राऊंडवरील चिमुकल्यांसाठी बालभवन ; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी मानवंदना  
कल्याण  : ज्यांचे कचरा हेच आयुष्य असले तरी कचरा हेच भविष्य बनू नये या उद्देशाने डम्पिंग ग्राऊंडवरील चिमुकल्यांसाठी अनुबंध संस्थेतर्फे बालभवनची सुरुवात करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आलाय.  “शिकल्याशिवाय वंचितांची प्रगती होणार नाही” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मूलमंत्र. त्यालाच साक्ष ठेऊन समाजातील वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्याचा अनुबंधचा हा प्रयत्न म्हणजे बाबासाहेबांना आणि त्यांच्या विचारांना वाहिलेली खरीखुरी आदरांजली ठरलीय.
जन्मापासूनच कचरा हेच खेळणं आणि कचऱ्याचा डोंगर हेच खेळाचे मैदान अशी या चिमुकल्यांची परिस्थिती. आणि ‘लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, त्याला आकार द्याल तशी मूर्ती घडेल’ या उक्तीला अनुसरून बालभवनच्या माध्यमातून कृतीची जोड देण्यात आली. या चिमूरड्यांमध्ये लहानपणापासूनच चांगल्या सवयी लागाव्या, खेळाची आवड, व्यायामाची आवड निर्माण व्हावी, उच्चार स्पष्ट होऊन बोलणे सुधारावे आणि एका चांगल्या जीवन पद्धतीची त्यांना आतापासूनच ओळख होण्याच्या दृष्टीने सर्वंकष प्रयत्न केले जाणार आहेत.
चिमुरड्यांना हे सर्व संस्कार-शिकवण देण्यासाठी सध्या मुख्य प्रवाहात आत्मविश्वासाने वाटचाल करणारे त्यांचेच भाऊबंद सज्ज झाले आहेत. कधीकाळी ज्यांचं बालपणही असंच कचऱ्याच्या सानिध्यात गेलं होतं. मात्र अनुबंध संस्थेने शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना आपल्या पायावर सक्षमपणे उभं राहण्याचं बळ दिलं असून आता आपल्या दुसऱ्या पिढीलाही मुख्य प्रवाहासाठी सक्षम करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. त्यासाठी राहुल साबळे, महादेव घुले, प्रिती ढगे, प्रभाकर घुले आणि रवी रतन घुले या तरुणांनी विशेष प्रशिक्षणही घेतल्याची माहिती अनुबंध संस्थेच्या प्रमूख प्राध्यापिका मीनल सोहनी यांनी दिली.
समाजसेवक विजय पंडीत यांच्या सहकार्याने सध्या केवळ सोनवणे कॉलेजात हा उपक्रम सुरू करण्यात आला असला तरी आणखी 3 ठिकाणीदेखील तो लवकरच सुरु होणार आहे. युवा उद्योजक मंदार घोडके, मयुरेश सरोदे, एलएनएन न्यूजचे केतन बेटावदकर, महाराष्ट्र1 न्यूज चॅनेलचे आतिश भोईर यांच्यासह विशाल जाधव, विशाल कुंटे, सूर्यकांत कोळी आदींच्या उपस्थितीत शुक्रवारी या उपक्रमाला प्रारंभ झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *