दुसऱ्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गोल्ड मेडल
कल्याण डोंबिवली कुस्तीगीर संघटनेकडून कल्याणात जंगी स्वागत
चंद्रपूर ब्रम्हपुरी येथे झालेल्या दुसऱ्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कल्याणची वैष्णवी पाटील ही चमकदार कामगिरी केली आहे. ६२ किलो वजनी गटात खेळताना वैष्णवी पाटील हिने सुवर्ण पदक पटकावले आहे. तर कल्याण मधील सानिया देसले हीने कुमार गटातून ४६ किलो वजनी गटात खेळताना कांस्य पदक मिळवले. कल्याण डोंबिवली कुस्तीगीर संघटनेतर्फे या विजयी खेळाडूंचे कल्याण रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत केले.
वैष्णवी अंबरनाथ तालुक्यातील मंगरूळ या गावतील आहे. लहानपणापासूनच तिलाच नव्हे तर आई वडिलांना देखील कुस्तीची विशेष आवड होती. वैष्णवीच्या कुटुंबीयांनी तिला कुस्तीसाठी प्रोत्साहन दिल. वैष्णवी पाटील हिने कल्याण मधील नांदीवली गावातील जय बजरंग तालमीत कुस्तीच धडे गिरवले. आतापर्यंत तिने सहा ते सात राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. मार्च मध्ये महिला कुस्तीगीरासाठी सांगली येथे आयोजित पहिल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कल्याणच्या मातीतील वैष्णवी पाटील हीने चमकदार कामगिरी करत कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता. त्यापाठोपाठ वैष्णवीने चंद्रपूर येथील चमकदार कामगिरी करत गोल्ड मेडल पटकावले आहे. कल्याण मधील सानिया देसले हिने देखील कांस्य पदक पटकावले. या विजयाबाबत बोलताना वैष्णवी पाटीलने समाधान व्यक्त केले तसेच माझं लक्ष ऑलिंपिक असल्याचे सांगितले. वैष्णवी पाटील तिच्या यशा नंतर कल्याण डोंबिवली शहरातून तीच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.