मुंबई : राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल तर शिवसेना शिंदे गटाकडून मिलींद देवरा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर काँग्रेसकडून राज्यसभेसाठी चंद्रकांत हंडोरे यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एक दिवसापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात आलेल्या मिलिंद देवरा यांनाही शिंदे गटातर्फे उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसने राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. चंद्रकांत हंडोरे हे माजी मंत्री असून त्यांना २०२२ साली झालेल्या विधानपरिषद निवडणुकांत पराभव स्वीकारावा लागला होता.
मेधा कुलकर्णी पुणे महानगरपालिकेत तीनवेळा नगरसेविका म्हणून निवडून गेल्या होत्या, तसेच 2014 साली त्या विधानसभेत निवडून गेल्या होत्या. कोथरुड मतदारसंघातून गेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळेस चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी मिळाल्यामुळे त्या प्रचंड नाराज झाल्या होत्या. त्यांना विधानपरिषदेचे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र गेल्या पाच वर्षांत झालेल्या विधानपरिषद निवडणुकांत त्यांना संधी मिळाली नाही. अखेर त्यांना आता थेट संसदेत जाण्याची संधी मिळाली आहे.
डॉ. अजित गोपछडे हे भाजपच्या डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र आरोग्य विद्यापाठीचे ते संचालकही आहेत. यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही काम केले आहे.
दक्षिण मुंबईचे एकेकाळी प्रतिनिधित्व करणारे मिलिंद देवरा आता शिंदे गटातून राज्यसभेत जायला सज्ज झाले आहेत. दक्षिण मुंबई देशातील श्रीमंत लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. यात कुलाबा, शिवडी, भायखळा, मुंबादेवी, वरळी, मलबार हिल हे विधानसभेचे मतदारसंघ येतात.
मुंबईतील मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी हे दोन नेते सोडून गेले आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाला आता मुंबईवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचं वाटते. हंडोरे हे मुंबईचे महापौर राहिलेले आहेत, राज्य मंत्रिमंडळात मंत्री होते. मुंबईत चेंबूर आणि परिसरातील दलित मतदार असलेल्या भागात त्यांची काही प्रमाणात ताकद आहे. त्यामुळेच त्यांना उमेदवारी मिळाली असल्याचे कारण सांगितले जात आहे. तसेच विधान परिषद निवडणुकीत हंडोरे यांना दगाफटका झाला होता आणि त्यांचा पराभव झाला होता. त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न आहे.
महाराष्ट्रातून हे खासदार निवृत्त
१५ राज्यातील राज्यसभेच्या ५६ जागा रिक्त होत आहेत. त्यात महाराष्ट्रातील ६ खासदार आहेत. भाजपचे विद्यमान खासदार नारायण राणे, प्रकाश जावडेकर, व्ही व्ही मुरलीधरन, हे खासदार निवृत्त होणार आहेत. शिवसेनेचे ठाकरे गटाचे अनिल देसाई, काँग्रेसचे खासदार कुमार केतकर, आणि राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांचा समावेश आहे.
येत्या २७ फेब्रुवारीला राज्यसभा निवडणूकीसाठी मतदान होईल आणि त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे.
————–