शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम
मुंबई : राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. कांदा, कापूस, धान, सोयाबीन, हरभरा, तुरीसह शेतमालाला भाव नाही त्यातच अवकाळीने झोडपल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाची राखरांगोळी झाली आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असताना, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री धुळवड खेळण्यात मग्न होते. शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. संकटातील शेतकऱ्यांला सरकारने तातडीने मदत जाहीर केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजचे कामकाज सुरु होताच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा व्हावी यासाठी विरोधकांनी स्थगन प्रस्ताव दाखल केला होता पण सरकारने तो फेटाळला. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले व त्यांनी सभात्याग केला. याविषयावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, अवकाळी पावासाने शेतातील उभी पिकं खराब झाली, गहू, हरभरा, फळबागा, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची भयावह परिस्थिती असताना यापेक्षा दुसरा कोणता महत्वाचा विषय आहे. सर्व प्रश्न बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे अशी विरोधकांची मागणी होती पण सरकारने त्यावर समाधानकारक उत्तर दिले नाही. माहिती घेऊन नंतर भूमिका मांडू अशी सरकारची मोघम भूमिका होती. दोन दिवसाच्या अवकाळी पावसाने शेतातील पीकं जमीनदोस्त होत असताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले, त्यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री धुळवड खेळण्यात मग्न होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण होऊ नये हीच विरोधकांची मागणी आहे. मागील आठवड्यातही कांदा, सोयाबीन, कापसचा प्रश्न उपस्थित केला होता. नाफेड कांदा खरेदी करत असल्याचे सरकारने सभागृहात सांगितले पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. कांदा खरेदी होत नाही. वीज कनेक्शन कापणार नाही असे सांगितले होते पण विदर्भ विभागातच ९९९५ शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले आहे असे पटोले यांनी सांगितले.