महाराष्ट्रात लवकरच लोकायुक्त – देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण मागे
नवी दिल्ली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अपेक्षित असलेला लोकायुक्त महाराष्ट्रात लवकरच नियुक्त करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.रामलिला मैदान येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज उपोषण सोडले. यावेळी हजारे यांच्या मागण्या मान्य केल्याचे निवेदन सोपविल्यानंतर मंचावर मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या विविध मागण्या केंद्र शासनाने मान्य केल्या असून यासंदर्भातील प्रधानमंत्री कार्यालयाचे पत्र आज आम्ही सोपविले आहे. देशात भ्रष्टाचार मुक्त वातावरणासाठी केंद्र शासन हजारे यांना पूर्ण समर्थन देते. यासंदर्भात केंद्रात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्त नेमण्याबाबत हजारे यांनी केलेल्या मागणीवर केंद्र शासनाने सकारात्मकता दर्शविली आहे. या संदर्भात संशोधन करण्याचे केंद्र शासनाने मान्य केले आहे. हे संशोधन पूर्ण होताच देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात लोकायुक्त नियुक्त करण्यात येईल,अशी ग्वाही मुख्यमंत्री यांनी दिली.
हजारे यांनी शेती विकासासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्या संदर्भात मागणी केली. या शिफारशींच्या स्पष्टतेबाबत केंद्र शासनाने सकारात्मकता दर्शविली आहे. शेतमालाला रास्तभाव, शेतीचे अवजारे खरेदीत जीएसटी कमी करण्याबाबत केंद्रशासन लवकरच निर्णय घेईल. निवडणूक कार्यपद्धतीतील सुधारणांबाबत त्यांनी केलेल्या विविध मागण्यांस केंद्राने सकारात्मकता दर्शविली आहे. याबाबतच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येतील व सुयोग्य निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. केंद्र शासन त्याच्या मागण्या नियत काळात पूर्ण करेल व त्यांना पुन्हा उपोषण करण्याची गरज भासणार नाही, असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
मागण्यांची पूर्तता वेळेत व्हावी – अण्णा हजारे
शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट दर देणे, देशात भ्रष्टाचारमुक्त वातावरणासाठी लोकपाल व लोकायुक्तांची नियुक्ती करणे आणि निवडणूक कार्यपद्धतीबाबत सुधारणा अशा १३ मागण्या केंद्र शासनाने मान्य केल्या असल्याने आपण उपोषण मागे घेत असल्याचे श्री. हजारे यांनी यावेळी आपल्या संबोधनात सांगितले. केंद्र शासनाने मान्य केलेल्या मागण्यांवर येत्या ६ महिन्यात अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
२३ मार्च या शहिद दिनापासून रामलिला मैदानावर सुरु असलेल्या उपोषणाची दखल घेऊन केंद्र शासनाने घेतलेल्या सकारात्मक निर्णयाबाबत आपण समाधानी असल्याचे अण्णा. हजारे यावेळी म्हणाले. केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र शेखावत यांनी वेळोवेळी भेट घेऊन मागण्यासंदर्भात वाटाघाटी केल्या आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले.