नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : राजस्थानची अंजू नामक महिला 6 महिन्यांपूर्वी फेसबुक फ्रेडला भेटण्यासाठी पाकिस्तानला निघून गेली होती. तेथे 25 जुलै रोजी तिने नसरूल्ला नामक इसमाशी लग्न केले होते. त्यानंतर ही महिला आज, बुधवारी अमृतसरच्या अटारी-वाघा सीमेहून भारतात परतली.
अंजू अमृतसरला पोहोचल्यावर सुरक्षा यंत्रणांनी तिची चौकशी केली. ज्यामध्ये तिचा पाकिस्तानात जाण्यामागचा उद्देश आणि 4 महिन्यांच्या वास्तव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यानंतर अंजू विमानाने दिल्लीला रवाना झाली. प्राथमिक माहितीनुसार, अंजू रात्री 10 वाजता इंडिगोच्या फ्लाइटने दिल्लीला पोहोचेल. अंजूने अमृतसर विमानतळावर मीडियाशी बोलण्यास नकार दिला. यावेळी तिने सांगितले की, ती आनंदी आहे. यापेक्षा जास्त काही भाष्य करू इच्छित नाही. तर पाकिस्तानमध्ये नसरुल्ला म्हणाला की, अंजू तिच्या मुलांमुळे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती आणि तिच्याकडे परत जाण्याशिवाय पर्याय नव्हता.
अंजूने पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथील अप्पर दीर येथील नसरुल्ला या फेसबुक मित्राशी 25 जुलै रोजी लग्न केले होते. त्यानंतर पाकिस्तानने त्याचा व्हिसा 1 वर्षासाठी वाढवला. अंजू आता पाकिस्तान सरकारकडून एनओसी घेऊन भारतात आली आहे, जेणेकरून ती पाकिस्तानात परत जाऊ शकेल. अंजूची नसरुल्लासोबत सोशल मीडियावर मैत्री झाली. ज्याचे नंतर प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर अंजूने पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान सरकारची परवानगी मिळाल्यानंतर ती पाकिस्तानात गेली. या काळात तिने आपली 15 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षाचा मुलगा भारतात सोडले होते. यावर्षी ऑगस्टमध्ये पाकिस्तान सरकारने अंजूचा व्हिसा एक वर्षासाठी वाढवला आहे.आता आपल्या मुलांना घेऊन पाकिस्तानात जाण्याची तिची योजना असल्याची माहिती सूत्रांनी दिली.