मुंबई : पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली असतानाच, दुसरीकडे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. अजित पवारांचे फोन जप्त करावा करावा आणि त्यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केलेली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.
अजित पवार नेहमी पत्रकार परिषदेमध्ये भडकून बोलत असतात, तेच अजित पवार कालच्या पत्रकार परिषदेत गांगरल्यासारखे वागत होते, असंही अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. आमदार सुनील टिंगरे पोलीस स्टेशनमध्ये का आले होते? कोणाच्या सांगण्यावरुन आले होते? हे एकदा टिंगरेंना देखील विचारलं पाहिजे. काल त्यांनी जे जे सांगितलं ते धादांत खोटं होतं. अजित पवारांनी निश्चितच आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं अजित पवारांचा फोन खरंतर जप्त झाला पाहिजे खरंतर त्यांची नार्को टेस्टही व्हायला हवी होती, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.
अजित पवारांचा पुण्याच्या आयुक्तांना फोन आला होता का? असेल तर त्यांनी तात्काळ स्पष्टीकरण द्यावं. फोन केला की नाही? फोन केला नसेल तर उत्तम पण केला असेल तर अजित पवारांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा, अशी मागणी देखील दमानिया यांनी केलीये. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करावी, अशी मागणी देखील दमानिया यांनी केलीये.
*****