नंदुरबार : अंगणवाडी कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे बोलणे व अपमानास्पद वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नंदुरबार अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केली आहे. यासाठी आज हजारो अंगणवाडी सेविकांनी नंदुरबार जिल्हा परिषदेवर थाळी नाद मोर्चा काढला होता.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संपानंतर अंगणवाडी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वारंवार कारवाईच्या धमक्या आणि अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप अंगणवाडी सेविकांनी केला आहे. त्याबाबतची तक्रार घेऊन तसेच आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी हजारो अंगणवाडी सेविकांनी आज नंदुरबार जिल्हा परिषद कार्यालयाच्या बाहेर थाळी नाद आंदोलन केले. या आंदोलनाची दखल जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली नाही तर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडीची वेळ बदलणे, जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचा उर्मटपणा त्वरित बंद करावा, अधिकाऱ्यांना योग्य ती समज देण्यात यावी अशी मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी केली आहे.