ठाणे, 2 डिसेंबर : सुरज परमार आत्महत्या प्रकरणी कोणाच्या दरवाजावर डोके टेकवायला जात होतात ? अनंत करमुसे यांना पोलीस संरक्षणात मारहाण करण्याचा बालिशपणा का केलात ? वैभव कदम च्या आत्महत्येस जबाबदार कोण?…डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब या तीन प्रश्नांची उत्तरे द्या, असे जाहीर आव्हान राष्ट्र्वादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. जितेंद्र आव्हाड यांना दिले आहे.

सुरज परमार या विकासकाच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठामपा विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला, गटनेते हणमंत जगदाळे यांना अटक झाली तेव्हा डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब आपण स्वतःला वाचविण्यासाठी कोणाकोणाच्या दरवाजावर डोके टेकवायला जात होतात ? तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण यांच्याकडे का गेला होतात ? हे एकदा जाहीर करा. अनंत करमुसे यांना अमानुष मारहाण प्रकरणी, मी आपणांस ५ ऑगस्ट २०२० साली रात्री ८ वाजता आपल्या घरी येऊन विनंती केली होती की, असे करु नका तरी आपल्या खूशमस्कर्यांचे ऐकून कॅबिनेट मंत्री असतानाही आपण पोलीसांसमोरच अनंत करमुसे यांना बेदम मारहाण करुन बालिशपणा दाखविलात आणि पोलिसांचे करिअर बर्बाद केलेत याचे उत्तर द्या ! वैभव कदम या आपल्या अंगरक्षकाच्या आत्महत्येस व त्यांच्या कुटुंबाचा आधार नष्ट करणाऱ्या गोष्टीस जबाबदार कोण ? या तीन प्रश्नांची उत्तरे द्या. अजित पवार व धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट व बेलगाम आरोप करण्याअगोदर आपणही काचेच्या घरात रहातोय, आपण एक दगड माराल तर आम्ही दोन दगड मारु शकतो हे लक्षात ठेवा, असा इशाराही आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिला.

३० नोव्हेंबर व १ डिसेंबर असे दोन दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत येथे वैचारिक मंथन शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी प्रास्ताविक केले, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल यांनी स्वागत अध्यक्षीय भाषण केले तर व राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी समारोपाच्या भाषणात बोलताना २००४, २०१७, २०२९, २२ जून २०२२, २ जुलै, १२ जुलै, १२ ऑगस्टपर्यतच्या पक्षातील घटनांची सविस्तर माहिती दिली. शरदचंद्र पवारसाहेब यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा राजीनामा मागे घ्यावा म्हणून सर्वप्रथम माझ्या नेतृत्वाखाली ठाण्यात व बॅलॉर्ड इस्टेट व यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आंदोलन करण्यात आले होते. अजितदादा नेहमीच खरे बोलतात यामुळे याबाबत अजितदादांनी जे सांगितले आहे ते सर्वस्वी खरेच आहे, असेही आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *